पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – सरदार आंदेकर टोळीच्या विरोधात तरुणांना एकत्रित करून स्वतःची टोळी करणाऱ्या सूरज अशोक ठोंबरे (रा. नाना पेठ) याला फरासखाना पोलिसांनी अटक केली आहे. महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यानुसार (मोका) कारवाई केल्यानंतर तो फरार होता.
आंदेकर टोळीतील एका तरुणावर सूरज ठोंबरेच्या टोळीने 23 फेब्रुवारी हल्ला केला होता. याप्रकरणी समर्थ पोलिस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. ठोंबरे याने टोळी निर्माण करून गुन्हे करत असल्यामुळे त्यांच्यावर मोकानुसार कारवाई केली होती. दरम्यान, त्याच्या टोळीतील पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. ठोंबरे, त्याचा सहकारी आकाश सासवडे, शुभम पावळे हे फरारी होते. या गुन्ह्याच्या तपास सहायक पोलिस आयुक्त सतीश गोवेकर करत होते. ठोंबरे व त्याच्या साथीदाराला पकडण्यासाठी विशेष पथक तयार केले होते. तो हैदराबाद शहरात लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
त्यानुसार सहायक पोलिस निरीक्षक अभिजित पाटील यांच्या पथकाने हैदराबाद मध्ये जाऊन त्याला अटक केली. त्याच्या सोबत त्याचा सहकारी पवन उर्फ विकास राकेश करताल याला अटक केली आहे. तो सांगवी पोलिस ठाण्यात फरारी होता. त्याला सांगवी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, अपर पोलीस आयुक्त डॉ संजय शिंदे, पोलीस उपायुक्त डॉ प्रियंका नारनवरे, सहायक पोलीस आयुक्त सतीश गोवेकर, सहायक पोलीस निरीक्षक अभिजित पाटील, पोलीस उपनिरीक्षक विशाल मोहिते, सागर केकाण, अमेय रसाळ, शाम सूर्यवंशी, मेहबूब मोकाशी, तुषार खडके, मल्लिकार्जुन स्वामी, भालेराव यांच्या पथकाने केली.






