नवी दिल्ली – ज्युनियर कुस्तीपटूच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेला आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू सुशील कुमार याची दिल्ली न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. सुशील कुमार याच्या पोलीस कोठडीत वाढ करावी अशी मागणी करणारी याचिका न्यायालयाने फेटाळली आहे.
सुशील कुमारला सागर धनख़ड याच्या हत्येप्रकरणी अटक झाली आहे. सागर धनखड हा नवी दिल्लीतील ज्या घरामध्ये राहत होता ते घर खाली करण्यासाठी सुशील कुमार त्याच्यावर दबाव टाकत होता. सागर धनखड त्या घराचे भाडेही देत नव्हता. याचदरम्यान सागर धनखड याने सुशील कुमारला दुर्बल , बदमाश म्हणून सर्वांसमोर हिणवले होते. सगळ्यांच्या समोर नवख्या तरुणाने केलेला अपमान सुशीलच्या जिव्हारी लागला होता.
4 मे रोजी सुशील कुमार आणि त्याच्या सहकाऱ्यांनी सागर धनखड व त्याच्या मित्रांचे अपहरण केले. छत्रसाल स्टेडियममध्ये नेऊन त्यांना मारहाण केली होती. या मारहाणीत पाच कुस्तीपटू जखमी झाले. यामध्ये सागर, सोनू व अमित यांच्यासह इतर दोघांचा समावेश होता.






