औरंगाबाद (जिल्हा प्रतिनिधी दत्तात्रय मोटे) – गेवराई तालुक्यात एक दुर्देवी घटना घडली आहे. कपडे धुण्यासाठी गेलेल्या आई, मुलगी आणि पुतणीचा बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना आज सकाळी मिरगाव गोदावरी पात्रात घडली असून गावावर शोककळा पसरली आहे.
आई रंजना गोडबोले (31), मुलगी अर्चना गोडबोले (11), पुतणी शितल गोडबोले (10) अशी मृतांची नावे आहेत. गेवराई तालुक्यातील मिरगाव येथील गोदावरी पात्रात रंजना या आज सकाळी अर्चना व शितललासोबत कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. दरम्यान अर्चना पोहण्यासाठी पाण्यात उतरली. पाण्याचा अंदाज न आल्याने ती बुडू लागली. तिला पोहता येत नव्हते.
रंजनाने मुलीला बुडताना पाहून पाण्यात उडी घेतली. सोबत पुतणी शितलही पाण्यात उतरली. परंतु मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात तिघींचा पाण्यात बुडुन मृत्यु झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन तिघींचा मृतदेह बाहेर काढला. मृतदेह शवविच्छेदनासाठी तलवाडा येथे पाठवण्यात आले आहेत. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.






