मुंबईत लसीकरणाला पुन्हा एकदा ब्रेक

मुंबई (प्रतिनिधी चेतन किर्दत) – मुंबईतील लसीकरण अजूनही केंद्र सरकारकडून होणाऱ्या लसपुरवठ्यावर अवलंबून आहे. त्यात लसपुरवठा नियमितपणे व पुरेशा प्रमाणात होत नसल्याने वारंवार लसीकरणाला ब्रेक लागताना दिसत आहे. आताही लससाठा उपलब्ध नसल्याने गुरुवारी (३ जून) मुंबई महापालिका प्रशासनाने लसीकरण स्थगित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईत गुरुवारी पालिकेच्या वतीने कुठेही लसीकरण होणार नाही.

मुंबई पालिकेकडे लशींचा पुरेसा साठा नसल्याने गुरुवारी पालिकेसह सरकारी केंद्रांवर लसीकरण होणार नाही. पालिकेकडे उद्या दिवसभरामध्ये लससाठा उपलब्ध होण्याची शक्यता आहे. तसा साठा उपलब्ध झाल्यास शुक्रवारपासून पुन्हा लसीकरण नियमितपणे केले जाईल, असे महापालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. लसीकरण बंद राहणार असल्याने नागरिकांची जी गैरसोय होणार आहे त्यासाठी आम्ही दिलगीर आहोत, असे नमूद करतानाच लसीकरण केंद्र व वेळापत्रकाविषयीच्या पुढील सूचना आम्ही देत राहू, असेही पालिकेने नमूद केले आहे.

दरम्यान, राज्याला केंद्राकडून होणारा मर्यादित लस पुठवठा लक्षात घेता १८ ते ४४ वयोगटाचे लसीकरण आधीच थांबवण्यात आलेले आहे. ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सुरळितपणे व्हावे यासाठी हे पाऊल उचलण्यात आलेले आहे. मात्र, या वयोगटासाठीही लस तुटवडा भासत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. मुंबईसारख्या शहरातही लसीकरण थांबवावे लागत असल्याने लसीकरणाला वेग कसा येणार तसेच १८ ते ४४ वयोगटाचे लसीकरण आणखी किती काळ पुढे ढकलले जाणार, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here