नागपूर – कोरोनामुळे समाजाच्या भल्यासाठी लॉकडाऊन लागले असले तरी, या लॉकडाऊनमुळे अनेकांचे रोजगार हिरावून घेतले आहेत. दोन वेळच्या पोटाच्या लढाईसाठी अनेक तरुण वाममार्गाला लागले आहेत. हे सिध्द करणारी घटना नुकतीच नागपूरात घडली आहे. येथे एकाने चक्क या पोलीस वसाहतीतल्या क्वारंटाइन सेंटर मधील २३ पंखे चोरले आहेत. इतक्यावरच तो थांबला नाही तर त्याने ३ पलंग आणि गाद्यांवरही हात साफ केलाय. येथील नळाच्या तोट्याही त्याने सोडलेल्या नाहीत. आश्चर्याची बाब म्हणजे पोलीस ठाण्यापासून अगदी हाकेच्या अंतरावरील ठिकाणी या चोराने हा प्रताप करून दाखवलाय.
नागपूर शहरातील पाचपावली पोलीस ठाण्यापासून अवघ्या काही पावलांवरील या क्वारंटाइन सेंटरवर पाळत ठेवत चोराने हा डल्ला मारलाय. विशेष म्हणजे ‘कानून के हाथ लंबे होते है…’ म्हणणाऱ्या पोलिसांना घराशेजारी घडत असलेल्या या चोरीची साधी खबरही नव्हती. दोन दिवसांपूर्वी पोलीस कमाल चौकात गस्त घालत असताना त्यांना विक्की उंदीरवाडे नावाचा तरुण पाठीवर काही वस्तू घेऊन जाताना दिसला… संशय आल्याने पोलिसांनी त्याची झडती घेतली. तेव्हा त्यांनाही धक्काच बसला. खांद्यावरील बॅगमध्ये पंखा पाहून तेही चक्रावले. पोलिसी खाक्या दाखवून चौकशी केल्यावर त्याने तो पंखा पोलीस वसाहतीमधून लंपास केल्याचे त्याने कबूल केले. अशाच प्रकारे आपण पोलीस वसाहतीतल्या क्वारंटाइन सेंटरमधून २३ पंख्यांसह इतर साहित्य चोरल्याचेही त्याने मान्य केले.
पोलिसांनी त्याला अटक करून मोठ्या संख्येने चोरलेले पंखे व इतर मुद्देमाल जप्त केला आहे. चोरलेल्या साहित्यातील अनेक वस्तू विकल्याची कबुलीही त्याने चौकशीत दिली आहे. घटनेचे स्थळ पाचपावली पोलीस स्टेशन पासून अवघ्या काही पावलांवर आहे. पण तेच जर सुरक्षित नसेल तर उर्वरित शहरात कायदा सुव्यवस्थेची दशा काय असेल, असा प्रश्न स्थानिक नागरिक विचारत आहेत.






