सातारा (प्रतिनिधी दिनेश लोंढे) – राष्ट्रवादीचे खासदार श्रीनिवास पाटील यांच्या गोटे (ता. कराड) येथील घरात पाणी घुसले. यामुळे फर्निचर भिजून व आजूबाजूच्या परिसरात पाणी गेल्याने नुकसान झाले. मंगळवारी (दि. १) झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे कराडसह परिसरात हाहाकार उडाला. खासदार श्रीनिवास पाटील यांनाही त्याचा फटका बसला. यामुळे नैसर्गिक ओढ्यावरील अतिक्रमणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
मंगळवारी दुपारी अचानकपणे पावसाला सुरुवात झाली. सुमारे दोन तास पाऊस धो-धो कोसळत होता. या ढगफुटीमुळे कराडसह मलकापूर परिसरात सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. अनेक दुकान गाळ्यांसह झोपडपट्टी व घरांमध्ये पाणी शिरल्याने कोट्यवधीची हानी झाली.
मलकापूर शहरातील आगाशिवनगर परिसरात अनेक कॉलन्यामधील घरात पाणी शिरले. तर गोटे येथे पुणे-बंगळूर आशियाई महामार्गालगत असलेल्या खासदार श्रीनिवास पाटील यांच्या घरात पाणी घुसून फर्निचरचे नुकसान झाले. तसेच घराच्या बाजूला असलेल्या शेतीचेही मोठे नुकसान झाले आहे.
फुलझाडे वाहून गेले असून लॉन भिजून नुकसान झाले. भात लागणीसाठी टाकलेल्या तरवांमध्ये गाळ साचल्याने व ऊस लागण्यासाठी शेतात सोडलेल्या सरीचे ही नुकसान झाले आहे. याशिवाय खासदार श्रीनिवास पाटील यांच्या कार्यालयातही पाणी घुसल्याने त्याचे नुकसान झाले. सुदैवाने कागदपत्रांची व इतर धनधान्याचे कोणतेही नुकसान झाले नाही.
वारुंजी विमानतळ बाजूकडून येणा-या नैसर्गिक ओढ्यांवरती मोठ्या प्रमाणावरती बांधकामे झाल्याने नैसर्गिक ओढे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे पाऊस पडल्यानंतर पाण्याचा प्रवाह जाण्यासाठी असणारे पुढे नष्ट होत असल्याने मंगळवारी झालेल्या पावसाने आजूबाजूच्या शेतात प्रवाह निर्माण केला. त्याचा फटका परिसरातील शेतकऱ्यांना बसला असून खासदार श्रीनिवास पाटील यांच्या घरातही पाणी घुसल्याने नैसर्गिक ओढ्यांवरील अतिक्रमणांचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे.






