पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – रस्त्यावर भाजी विक्री करताना जोरजोरात ओरडून मोठा आवाज काढल्याने झालेल्या वादातून 15 ते 20 जणांच्या जमावाने भाजीविक्रेत्यांवर हल्ला करीत मारहाण केली. आरोपीने एकास चाकूने पोटात भोसकल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. फरासखाना पोलिसांनी या प्रकरणात पाच जणांना अटक केली. न्यायालयाने त्यांना 7 जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.
वाजीद बशीर शेख (वय 35, रा. 715, सरोज अपार्टमेंट, नाना पेठ ), शब्बीर इकबाल टीनवाला (वय 30), इस्माईल शब्बीर पूनावाला (वय 35), तबरेज इब्राहीम शेख (वय 36) आणि अल्लाउद्दीन इमामुद्दीन शेख (वय 40, चौघे रा. रविवार पेठ) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह आणखी 18 जणांविरोधात फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अनिरुद्ध इनामदार (वय 20, रा. 650, रविवार पेठ, काची आळी) याने फिर्याद दिली. पोटात चाकू लागल्याने देवांग सचिन कंट्रोल्लू (वय 19, रा. काची आळी) हा जखमी झाला असून, त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
रविवार पेठेत मंगळवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. इतर आरोपींना अटक करण्यासाठी व विविध मुद्यांवर तपास करण्यासाठी सरकारी वकील किरण बेंडभर यांनी आरोपींच्या पोलिस कोठडीची मागणी केली.







