सांगली (प्रतिनिधी शरद मोरे) – कडेगाव तालुक्यातील तडसर येथे शेतमजुराचा बुधवारी दुपारी धारदार शस्त्राने डोक्यात वार करून खून करण्यात आला. धनाजी भीमराव कोळी (वय 45, रा. कुंडल, ता. पलूस) असे त्यांचे नाव आहे. खुनाचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून अज्ञात संशयित फरारी आहे. यासंदर्भात चिंचणी- वांगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
मूळचे जतचे व सध्या कुंडलमध्ये राहत असलेले धनाजी कोळी शेतमजूर म्हणून तडसरमध्ये काम करीत होते. आज दुपारी दीडच्या सुमारास त्यांचा माळी वस्तीजवळच्या उसाच्या शेतात खून झाला असावा, असा अंदाज आहे. कोळी यांच्या उजव्या कानाच्या मागे डोक्यात आणि कपाळावर समोरील बाजूस धारदार शस्त्राचे वार आहेत.
सहायक पोलिस निरीक्षक संतोष गोसावी यांच्यासह पोलिस पथकाने घटनास्थळी पाहणी केली. खुनाचे कारण समजलेले नाही. संशयिताचा पोलिस शोध घेत आहेत. तानाजी ज्ञानू कोळी (रा. कुंडल) यांनी चिंचणी- वांगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिस उपअधीक्षक अंकुश इंगळे यांच्या मार्गदर्शनाने संतोष गोसावी तपास करीत आहेत.
पोलिस उपअधीक्षक अंकुश इंगळे यांनी तत्काळ घटनास्थळी भेट दिली. त्यांनी घटनेची माहिती घेतली. संबंधित पोलिस अधिकार्यांना अज्ञात संशयिताचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या.







