कोल्हापूरात पूर्ववैमनस्यातून घरांवर हल्ला; दोन महिलांसह तिघे जखमी

कोल्हापूर (जिल्हा प्रतिनिधी नियाज जमादार) – येथील दौलतनगरात पूर्ववैमनस्यातून एका टोळक्याने घरांवर हल्ला केला. बुधवारी सायंकाळी घडलेल्या प्रकारात घरातील साहित्याची तोडफोड करण्यात आली. तसेच वाहनांवर झालेल्या दगडफेकीत दोन महिलांसह तिघे जखमी झाले. दुचाकींचेही नुकसान झाले आहे. घटनास्थळी मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.

मंगल पोवार, बाळाबाई चव्हाण, रमेश वडर अशी जखमींची नावे आहे. अलकुटे, पोवार यांच्या घरातील प्रापंचिक साहित्यांची तोडफोड करण्यात आली. आठ ते दहा जणांच्या टोळक्याने काठ्या, बॅट, स्टम्पचा वापर केला. दौलतनगरातील तीन बत्ती चौकातील घरांवर झालेल्या या हल्ल्याने एकच धावपळ उडाली. जमावाला बघून रेखा वडर या चिमुकल्याला घेऊन एका बाथरूममध्ये लपून बसल्या. या टोळक्याने त्या बाथरूमवरही फरशा व लाथा-बुक्क्यांनी मारल्या. भयभीत महिलांनी आरडाओरडा केल्याने गोंधळ उडाला.

तीन बत्ती चौकातील सुभाष पोवार, विनायक आलकुटे यांच्या घरातील तिजोरी, कपाटे, भांडी, खुर्च्यांची तोडफोड जमावाकडून करण्यात आली. दगड, विटा, बॅटने ही तोडफोड करण्यात आली. हल्लेखोरांमध्ये अतिश, विशाल, पप्पू, गोट्या, राहूल अशांचा सहभाग असल्याची माहिती जखमींनी पोलिसांना दिली.

दगडफेकीची माहिती मिळताच राजारामपुरी पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी आला. शहर उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांनी भेट देऊन पाहणी केली. तसेच जखमींकडून माहिती घेतली. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे हल्लेखोरांचा शोध सुरू केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here