मुंबई (प्राजक्ता अरूण चव्हाण) – सामाजिक, आर्थिक, धार्मिक, राजकीय, बौद्धिक इत्यादी क्षेत्रांत लोककल्याणार्थ सेवा व अनेक समस्यांची सोडवणूक करण्यासाठी सहकार्य करण्याचे काम पंचरत्न मित्र मंडळतर्फे गेली अनेक वर्षे केले जात आहे. नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने कोकण सोडून मुंबईत आलेल्या मात्र कोकणाचे म्हणजेच आपल्या जन्मभूमीचे ऋण फेडण्यासाठी सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय, पर्यावरण क्षेत्रात सातत्याने गेली अनेक वर्ष कार्यरत असलेल्या आर. सी. एफ कर्मचारी वर्गाच्या पंचरत्न मित्र मंडळ (रजि.) चेंबुरतर्फे अध्यक्ष अशोक भोईर, सचिव प्रदिप गावंड, खजिनदार सचिन साळुंखे यांच्या प्रयत्नाने अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येतात. मंडळाची स्थापना २००६ मध्ये करण्यात आली असून आजपर्यंत मंडळाच्यावतीने मुंबईसह उपनगरात व महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात अनाथश्रम, वृध्दाश्रम व खेडेगावातील तसेच आदिवासी भागातील शाळांमध्ये शालेय साहित्य वाटप व आरोग्य शिबिर आणि वृक्षारोपण तसेच विविध स्पर्धांचेही आयोजन केलेले आहे. सध्या संपूर्ण जगात ‘कोरोना’ महामारीने ग्रासले असून व सरकारने संचारबंदी लागू केल्यामुळे हातावर पोट असणारी कुटुंबे उपासमारीचे जीवन जगत आहेत. ‘कुठे कमी तिथे आम्ही’ या उक्तीप्रमाणे पंचरत्न मित्र मंडळ सदैव तत्पर असते. माणुसकीची जाणीव म्हणून सदर मंडळाने प्रबुध्दनगर, आर. सी. एफ् पोलीस ठाणे, चेंबूर येथील गरीब वसाहतीत जावून शंभर गरजू लोकांना अन्नधान्य किट व आवश्यक तेथे विविध साहित्याचे वाटप केले. रविवार दिनांक २६ जुलै २०२० रोजी श्री राम मंदिर, बाजी प्रभु देशपांडे मार्ग, शिवाजी नगर, गोवंडी येथे वृक्षारोपण करण्यात आले. वृक्षारोपण हाच पर्यावरण असमतोलावर उपाय. ‘झाडे लावा. झाडे जगवा.’ आज तुम्ही झाडांना जगवा. भविष्यकाळात हीच झाडे तुम्हाला वाचवतील. असा संदेश महाराष्ट्र हरित सेना, वन विभाग महाराष्ट्र शासनचे सदस्य युवा पत्रकार अशोक भोईर तसेच समाजसेवक प्रदिप गावंड यांनी या निमिताने दिला. यावेळी सोशल डिस्टगंसीनचे पालन करुन कार्यक्रम संपन्न झाला. मंडळ अध्यक्ष अशोक भोईर, सचिव प्रदीप गावंड, सहसचिव वैभव घरत, हनुमंत चव्हाण, डी. एम. मिश्रा तसेच दिनानाथ पाटकर (अध्यक्ष पर्यावरण सेल मुंबई), संतोष दामगुडे उपस्थित होते. शोध या मिडीयाचे यावेळी विशेष सहकार्य लाभले. यावेळी पंचरत्न मित्र मंडळाचे (रजि.) पदाधिकारी, सदस्य व सभासद, हितचिंतक उपस्थित होते. मंडळाने सातत्याने विविध उपक्रम राबवून समाज जनजागृती सह वृक्षारोपण केल्याबद्दल स्थानिकांकडून मंडळाचे कौतुक होत आहे.









