कराड मार्केट यार्डात व्यापाऱ्यांवर डीवायएसपींच्या पथकाची धडक कारवाई, सहा दुकाने सील

सातारा (प्रतिनिधी दिनेश लोंढे) – जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी कराड मार्केट यार्ड येथे डीवायएसपी डॉ. रणजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी व्यापाऱ्यांच्यावर धडक कारवाई केली. यावेळी सहा दुकाने सील केली असून प्रत्येकी तीन हजार रुपयांचा दंड केला आहे. तसेच 10 दुचाकीही ताब्यात घेतल्या आहेत. यावेळी कारवाई पासून वाचण्यसाठी मार्केट यार्ड परिसरात व्यापाऱ्यांची चांगलीच पळापळ झाली.

कराड मार्केट यार्ड परिसरात अनेक दुकानांमधून विनापरवाना साहित्यांची देवाण-घेवाण होत असल्याची माहिती डीवायएसपी डॉ. रणजित पाटील यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी खात्री करून गुरुवारी सकाळी अचानकपणे पोलीस फौजफाट्यासह मार्केट यार्ड परिसरात धडक कारवाईचा सपाटा लावला. यावेळी कोणतीही परवानगी नसताना अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली अनावश्यक वस्तू विकणार्‍या दुकानदारांवर कारवाई करत सहा दुकाने सील केली. तसेच त्यांना प्रत्येकी तीन हजार रुपयांचा दंड करण्यात आला आहे. याशिवाय जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी व मोकाट फिरणार्‍या 10 दुचाकी पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. पोलिसांच्या धडक कारवाई दरम्यान मार्केट यार्ड परिसरात अनेक दुकानदार, अडत दुकानदार, घाऊक व किरकोळ विक्रेते हे जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाचे उल्लंघन करताना दिसून आले. त्यामुळे पोलिसांनी कारवाईचा धडाका लावला.

या कारवाईमध्ये स्वतः डीवायएसपी डॉ. रणजीत पाटील यांच्यासह वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोडसे यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. दरम्यान, पोलिसांनी अचानक राबवलेल्या कारवाईच्या मोहिमेमुळे व्यापार्‍यांमध्ये खळबळ उडाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here