पुणे (उपसंपादक वासंती देवळे) – कोरोनाने माणसाला बरेच काही शिकवलं आहे. पण याचवेळी माणसातील माणुसकीदेखील दिसून आली. पण काही ठिकाणी याच्या विपरीतही चित्र दिसत आहे. कोरोनाने मृत झालेल्या नातलगांच्या अंत्यविधीला कोणीही फिरकत नाही पण आता पुण्यात तर अंत्यविधीनंतर त्यांचे अस्थीकलश घ्यायला सुद्धा काही जणांचे नातेवाईक फिरकलेले नाहीत. यावरून समाजाची घट्ट म्हणवणारी विण नेमकी कुठवर विस्कटलीय…? त्याचीच परिचिती देणारं भयावह वास्तव पुण्यातल्या कैलास स्मशानभूमीत बघायला मिळालं.
याबाबत समजलेली माहिती अशी की, कोरोनाची साथ कमी झाल्यानंतर स्मशानभूमीतले कर्मचारी मृतांच्या नातेवाईकांना त्यांच्या आप्तेष्ठांच्या अस्थी घेऊन जाण्यासाठी फोन करू लागलेत. पण स्मशानभूमीत पडून असलेल्या या कोरोना मृतांच्या अस्थीच घ्यायला त्यांचे नातेवाईक फिरकत नाहीत.
कोरोना काळात तर या स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांना नाईलाजास्तव तब्बल 300 अस्थी कलशांचं संगम घाटावर सामूहिकपणे विधीवत विसर्जन करावं लागलं आणि आताही किमान 100 अस्थीकलश त्यांच्या आप्तेष्टांची वाट बघताहेत. आपलं म्हणवणारं कोणीतरी येईल आपल्याला एकदाचं विसर्जित करून मुक्ती देईल, अशीच कदाचित या अस्थिकलशांची अंतिम इच्छा असणार आहे. म्हणूनच कोरोना मृतांच्या नातेवाईकांना पालिका कर्मचाऱ्यांनी स्वत: फोन करून अस्थी घेऊन जाण्यास सांगितले देखील, पण अनेक जण कोरोना संसर्गाच्या भीतीपोटी स्मशानभूमीत येऊन अस्थी घेऊन जायला टाळाटाळ करत आहे. त्यामुळे आता पालिका कर्मचाऱ्यांपुढे या अस्थिकलशांचे काय करायचे असा प्रश्न उभा ठाकला आहे.






