नवी दिल्ली – मॅगी नुडल्स, किककॅट आणि नेसकॅफे यासारखी लोकप्रिय उत्पादने बनणाऱ्या नेस्ले या कंपनीच्या अंतर्गत कागदपत्रांमधून धक्कादायक खुलासा समोर आला आहे. नेस्लेच्या अंतर्गत कागदपत्रांमधून अनेक मोठ्या बाबी समोर आल्या आहेत. नेस्लेच्या या अंतर्गत कागदपत्रांमध्ये हे मान्य करण्यात आले आहे की कंपनीच्या खाद्य आणि पेय श्रेणीतील ७० टक्क्यांपेक्षा जास्त उत्पादने आरोग्याच्या व्याख्येत बसत नाहीत किंवा आरोग्याचे निकष पूर्ण करत नाहीत. नेस्ले ही जगातील खाद्यपदार्थ बनवणारी म्हणजेच सर्वात मोठी फूड कंपनी आहे. नेस्लेकडून हे देखील स्वीकारण्यात आले आहे की कंपनीने कितीही कल्पकता दाखवली तरी त्यांचे खाद्य पदार्थ कधीही आरोग्यदायी होणार नाही. फायनान्शियल टाईम्सने हा धक्कादायक खुलासा केला आहे.
इंग्लंडमधील जगप्रसिद्ध वर्तमानपत्र ‘फायनान्शियल टाईम्स’ने यांसदर्भातील वृत्त दिले आहे. नेस्लेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना २०२१च्या सुरूवातीला एक प्रेझेंटेशन देण्यात आले होते. त्या प्रेझेंटेशनमध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार नेस्लेची फक्त ३७ टक्के उत्पादनांनाच ज्यात खाद्यपदार्थ आणि खास वैद्यकीय पोषक आहाराचाही समावेश आहे, ऑस्ट्रेलियाच्या हेल्थ स्टार रेटिंग सिस्टमअंतर्गत ३.५ स्टार रेटिंग किंवा त्यापेक्षा कमी मानांकन मिळाले आहे. ३.५ स्टार रेटिंगमध्ये आरोग्याची मान्यताप्राप्त व्याख्या. ऑस्ट्रेलियाची हेल्थ स्टार रेटिंग सिस्टम ही खाद्यपदार्थांना ५ स्टारपर्यतच्या निकषानुसार मानांकन देते आणि हे मानांकन हा खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेचा जागतिक पातळीवरचा एक महत्त्वाचा निकष समजला जातो.
फायनान्शियल टाईम्समधील वृत्तानुसार नेस्लेच्या एकूण खाद्यपदार्थ आणि पेयांच्या श्रेणीतील ७० टक्के उत्पादने ही जागतिक गुणवत्तेच्या निकषांनुसार पुरेसे मानांकन मिळवू शकलेली नाहीत. तर कॉफीसारखी विविध ९० टक्के पेय हे मानांकन मिळवू शकलेली नाहीत. इतरही असंख्य उत्पादनांच्या बाबतीत अशाच बाबींचा खुलासा झाला आहे. म्हणजेच नेल्सेची बहुसंख्य उत्पादने ही आरोग्यदायी नाहीत असाच निष्कर्ष यातून निघतो. नेस्लेने आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिलेल्या अहवालात म्हटले आहे की आपण आपल्या कंपनीच्या उत्पादनांची गुणवत्ता वाढवण्यासाठी अनेक महत्त्वाच्या सुधारणा केल्या मात्र आपली उत्पादने ही आरोग्याच्या निकषांच्या गुणवत्तेची नाहीत. ग्राहकांकडून वाढती मागणी आणि नियामक संस्थांची गुणवत्तेची मागणी हा दबाव असतानाही आपण ते साध्य करू शकलेलो नाही. नेस्लेच्या ज्या उत्पादनांच्या गुणवत्तेची चर्चा या अहवालात झाली आहे त्या उत्पादनांच्या विक्रीतून कंपनीला जवळपास निम्मा म्हणजे ८४.३५ अब्ज डॉलरचा महसूल मिळतो.
नेस्ले ही एक आघाडीची स्विस कंपनी आहे. फायनान्शियल टाईम्समध्ये आलेल्या वृत्तामुळे कंपनीच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला आहे. या बातमीवर प्रतिक्रिया देताना कंपनीने स्टेटमेंट दिले आहे. त्यात नेस्लेने म्हटले आहे की ते संपूर्ण कंपनीच्या पातळीवर एका प्रकल्पावर काम करत आहेत. या प्रकल्पात पोषण आणि आरोग्यासंदर्भातील धोरणाला पुढे न्यायचे आहे. कंपनीची उत्पादने ग्राहकांच्या पोषणाच्या गरजा पूर्ण करतात याची खातरजमा करण्यासाठी हा प्रकल्प कंपनीअंतर्गत राबवला जातो आहे.






