चंदीगड (पंजाब) – कोरोनातून बरं झाल्यानंतर दिग्गज धावपटू मिल्खा सिंग यांना 31 मे रोजी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला होता. मात्र, गुरुवारी पुन्हा एकदा त्यांची तब्येत अचानक बिघडली. गुरुवारी दुपारी ऑक्सिजन पातळी खालावल्यानंतर त्यांनी पीजीआयच्या कोविड रुग्णालयात भर्ती करण्यात आलं. याठिकाणी त्यांना आयसीयू वार्डात दाखल करण्यात आलं आहे.
पीजीआयचे प्रवक्ता प्रोफेसर अशोक कुमार यांनी याबाबतची माहिती दिली. ते म्हणाले, की ऑक्सिजन पातळी खालावल्यानंतर मिल्खा सिंग यांना कोविड रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये भर्ती करण्यात आलं. त्यांना दुपारी ३ वाजून 35 मिनिटानं अॅडमिट करण्यात आलं. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांना डॉक्टरांच्या निरीक्षणात ठेवण्यात आलं आहे.
91 वर्षाच्या मिल्खा सिंग यांनी तीन दिवस आधी म्हणजेच 31 मे रोजी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला होता. 20 मे रोजी त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. यानंतर काही दिवस ते होम आयसोलेशनमध्ये होते. मात्र, प्रकृती बिघडत असल्यानं 24 मे रोजी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. .यानंतर 31 मे रोजी रुग्णालयातून त्यांना डिस्चार्ज मिळाला होता. त्यांच्या पत्नी निर्मल कौर (Nirmal Kaur) यांनाही कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर अजूनही उपचार सुरू आहेत. निर्मल या भारतीय महिला व्हॉलीबॉल टीमच्या माजी कॅप्टन आहेत.
मिल्खा सिंग यांची भारताचे महान धावपटू म्हणून ओळख आहे. त्यांनी आशियाई स्पर्धेत चार सुवर्ण पदक (Gold Medal) जिंकले होते. तसेच राष्ट्रकूल स्पर्धेतही विजेतेपद पटकावले. रोममध्ये 1960 साली झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत त्यांनी सर्वोत्तम कमगिरी केली. मात्र त्यांचे कांस्यपदक अगदी थोड्या फरकाने हुकले होते.






