नाशिक (विशेष प्रतिनिधी) – येथील श्रीगुरुजी रुग्णालयामध्ये ‘ मानव सेवा फाउंडेशन’ तर्फे ऑक्सिजन जनरेशन प्लांट चा लोकार्पणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मानव सेवा फाउंडेशन नाशिक यांच्या तर्फे श्रीगुरुजी रुग्णालयास बडोद्याच्या आरो इंजिनिअरिंग कंपनीने उत्पादित केलेला ऑक्सिजन जनरेशन प्लांट समर्पित करण्यात आला. 34 जंबो सिलेंडर मध्ये जेवढा ऑक्सिजन बसेल तेवढा ऑक्सिजन एका दिवसात तयार करण्याची क्षमता या 10NM3/hr प्लांट मध्ये आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये असंख्य कुटुंबावर परिणाम झाला. काही लोकांना मानसिक, काहींना आर्थिक परिणामाला सामोरे जावे लागले तर काही कुटुंबातील आपल्या प्रिय व्यक्तीला गमवावे लागले. अनेक रुग्णालयांना या काळात खूप मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची गरज निर्माण झाली. पण त्याप्रमाणात ऑक्सिजनचा पुरवठा होत नव्हता. या काळात श्रीगुरुजी रुग्णालयाला सुद्धा ऑक्सिजन पुरवठा नियमित ठेवण्यासाठी खूप कसरत, धावपळ करावी लागली. प्रशासनाने भविष्यात असे प्रसंग आलेच तर आपण ऑक्सिजन च्या बाबतीत परिपूर्ण असावे या दृष्टीने नियोजन करण्यास सुरुवात केली .
चांगल्या कार्यास नेहमीच समाजाचा हातभार लागतो. नाशिक मधील काही तरुण मनाच्या उद्योजकांना या कोरोना काळात आपण समाजासाठी चांगले काहीतरी काम करू अशी भावना मनामध्ये तयार होते आणि या भावनेतूनच काही मंडळी एकत्रित येतात. एक सामाजिक दायित्व म्हणून काहीतरी नवीन करायची मनामध्ये इच्छा तयार होते आणि या भावनेतूनच तरूण उद्योजकांचा ग्रुप आदिवासी आणि दुर्गम भागात सेवा देण्याच्या उद्देशाने एकत्रित आला आणि यातूनच ‘ मानव सेवा फाउंडेशनची’ निर्मिती झाली.
नाशिक शहरामध्ये गेल्या 13 वर्षांपासून अविरत रुग्ण सेवेमध्ये कार्यरत असलेले, वाजवी दरामध्ये उत्कृष्ट रुग्ण सेवा देत असलेले आणि अत्यंत कमी काळामध्ये नाशिककरांच्या हृदयामध्ये वेगळे स्थान मिळविलेले श्रीगुरुजी रुग्णालय या मंडळीच्या डोळ्यासमोर आले. आणि या रुग्णालयास ऑक्सिजन प्लांट समर्पित करण्याचा संकल्प केला आणि तो प्रत्यक्षात अवतरला.
आपण दिलेले दान हे सत्पात्री असावे किंवा आपण दिलेल्या दानाचा हा योग्य मार्गासाठी उपयोग झाला पाहिजे हा विचार करून मानव सेवा फाउंडेशनने अगदी योग्य ठिकाणी आणि योग्य वेळी हा ऑक्सिजन जनरेटर प्लांट श्रीगुरुजी रुग्णालयाला समर्पित करून एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे असे मनोगत श्रीगुरुजी रुग्णालयाचे अध्यक्ष तथा सुप्रसिद्ध अर्थतज्ञ आणि चार्टर्ड अकाउंटंट डॉक्टर विनायक गोविलकर यांनी केले.






