नंदुरबार (विशेष प्रतिनिधी) – नंदुरबारमध्ये बेकायदेशीर वाळू उपसा सुरू आहे. याप्रकरणी वाळू उपसा रोखण्यासाठी गेलेल्या महिला तलाठीस मारहाण केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. ही मारहाण भाजप नगरसेवकाने केल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान भाजप नगरसेवकानेही याऊलट तक्रार दाखल केली आहे. तर महिला तलाठीने आमच्याकडे पैसे मागितल्याची तक्रार दाखल केली आहे.
याप्रकरणी पोलिस सूत्रांनी दिलेली माहिती अशी, आज शनिवार (दि ५) जुन रोजी दुपारी वाळू तपासणी पथक फिरत असताना एका डंपरला अडवले. दरम्यान डंपर चालकाने डंपर न थांबवता पुढे दामटला. पथकातील तलाठी निशा पवार आणि त्यांच्या दोन सहकारी महिला कर्मचारी यांनी लगेचच त्या वाहनाचा पाठलाग करून पुढे अडविले. चालकाकडे आवश्यक कागदपत्र तपासणीसाठी मागितले असता त्याने हुज्जत घातली. तोपर्यंत नगरसेवक गौरव चौधरी हे घटनास्थळी येऊन पोहोचले. चौधरी यांनी त्याप्रसंगी वाद घालून मारहाण करीत धक्काबुक्की केली, असे तलाठी निशा पवार यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
यावरून भाजप नगरसेवक गौरव चौधरी यांच्या विरोधात गुन्हा नोंद झाला. त्यानंतर वाहन चालकाने वाळू तपासणी पथकावर लाच मागितल्याचा गुन्हा दाखल केला. वाहनासह पोलिस ठाण्यात आल्यानंतर पथकाने पैशाची माझ्याकडे पैशाची मागणी केल्याचा त्याने दावा केला.






