जागतिक पोहे दिवस : प्रत्येक भारतीयाच्या नाश्त्याचा अविभाज्य घटक पोहे; जाणून घेऊया पोह्यांचे अंतरंग

    (योगेश शुक्ल)
    सकाळच्या नाश्ताच्या अस्सल पारंपरिक पदार्थ म्हणजे पोहे. आजही प्रत्येक मराठी कुटुंबामध्ये सकाळी चहासोबत पोहेच नाश्तासाठी दिले जातात. केवळ सकाळचा नाश्ताच कशाला अगदी लग्न ठरवतांनाही प्रथम चहा-पोह्यांचा कार्यक्रम केला जातो. त्यामुळे पोह्यांची महती अशी काही शब्दांत सांगता यायची नाही. सुरुवातीच्या काळात साध्या असणाऱ्या पोह्यांमध्ये अनेक बदल केल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे आज कांदापोहे, बटाटा पोहे, तर्री पोहे असे अनेक पोह्याचे प्रकार पाहायला मिळतात. विशेष म्हणजे वर्ल्ड फेमस असलेल्या या पोह्यांचा आज हक्काचा दिवस. हक्काचा दिवस म्हणजे आज जागतिक पोहे दिवस आहे. खरंतर पोह्यांचाही खास जागतिक दिन असतो हे फार कमी जणांना माहित आहे.

    पहिला जागतिक पोहे दिन ७ जून २०१५ रोजी साजरा करण्यात आला. या दिवसाचा प्रणेता कोण हे नेमकं स्पष्ट नसलं तरीदेखील मॅगीच्या जगात आजही पोह्यांवर प्रेम करणारे असंख्य जण असल्याचं पाहायला मिळतं. मॅगीच्या गुणवत्तेवरुन सुरु झालेल्या वादामध्येच ट्विटरवर गमतीने कुणी तरी पोहे दिनाची संकल्पना मांडली आणि तिच पुढे रुजू झाली असं म्हटलं जातं.
    प्रत्येक प्रदेशानुसार, पोहे करण्याची पद्धती आणि चव बदलते. पोह्याचा नाश्ता चविस्ट तसेच आरोग्यदायीदेखील आहे. त्यामुळे संपूर्ण भारतात पोह्याच्या नाश्त्याला पंसती आहे. जे लोक डायटिंग करतात. त्यांच्यासाठी पोह्यांचा नाश्ता अत्यंत आरोग्यदायी समजला जातो. महाराष्ट्र, ओडिसा, मध्य प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, गुजरात आणि राज्यस्थानमध्ये पोह्याचा नाश्ता प्रसिद्ध आहे. भारतात पोह्याचा शोध नेमका कुठे लागला हे कोणाला माहिती नाही. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, पोह्यात 76.9 टक्के कार्बोहाड्रेटस आणि 23.1 टक्के प्रोटीन असते. वजन कमी करण्यासाठी पोहे फायदेशीर मानले जातात.

    पोह्यात 76.9 टक्के कार्बोहाड्रेटस असतात. तसेच पोह्यात 23 टक्के फॅट्स असतात. कार्बोहाड्रेटसमुळे शरीराला ऊर्जा मिळते. त्यामुळे सकाळी पोह्याचा नाश्ता आरोग्यदायी मानला जातो. पोह्यात लोहाचे प्रमाण भरपूर प्रमाणात असते. पोहे तयार करण्याच्या प्रक्रियेत तांदळावरून लोखंडी रूळ फिरवले जातात. या प्रक्रियेत लोह्याचा अंश पोह्यात शिरतो. त्यामुळे यात लोहाचे प्रमाण अधिक असते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी पोह्यांचा नाश्ता आरोग्यदायी मानला जातो. पोह्यात फायबरचे प्रमाण अधिक असते. पोह्याच्या सेवनाने रक्तातील साखर नियंत्रित होण्यास मदत होते. पोह्यांचा नाश्ता पचनास हलका असतो. त्यामुळे सकाळच्या नाश्त्यात त्याचा समावेश केला जातो. पोह्यामुळे पोट भरलेले राहते आणि खूप कमी लागते. पोहे खाल्ल्याने लठ्ठपणा वाढत नाही. एक वाटी पोह्यामध्ये कमीत कमी 250 कॅलरीज असतात. तसेच पोह्यांमध्ये व्हिटामिन, मिनरल आणि अँटी ऑक्सिडंट असतात.

    महाराष्ट्राच्या विविध भागांत पोहे करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. कांदा पोहे, बटाटा पोहे घरोघरी केले जातात.त्यासाठी कधी जाड पोह्यांचा वापर केला जातो, तर काही ठिकाणी पातळ पोह्यांचा.नागपुरला पोह्यांवर झणझणीत तर्री ओतून खायची पद्धत आहे. या पोह्यांना ‘तर्री पोहे’ किंवा ‘कट पोहे’ म्हणतात. पुण्यात सांबर पोहे प्रसिद्ध आहेत. येथे पोह्यांवर तर्रीऐवजी सांबर ओतलं जातं. तसंच खोबऱ्याची ओली चटणी यासोबत असते.कोल्हापूरचे मटार पोहे प्रसिद्ध आहेत. येथे पोह्यांमध्ये मटारीचे दाणे मोठ्या प्रमाणावर टाकतात. सोलापूरला पोह्यांमध्ये शेंगदाण्यांचं प्रमाण जास्त असतं.पश्चिम महाराष्ट्रामध्ये कालवलेले पोहे तर कोकण कोळाचे पोहे तर असे वेगवेगळ्या प्रकारचे कांदेपोहे पाहायला मिळतात. विशेष म्हणजे हा खाद्यपदार्थ महाराष्ट्राचा लाडका असला, तरी पोह्यांसाठी प्रसिद्ध असणारं शहर म्हणजे मध्य प्रदेशातील इंदौर.इंदौर येथे प्रत्येक गल्लीगल्लीत पोहे विकणाऱ्यांची मोठी संख्या असते. तेथे प्रत्येक हॉटेलमध्ये आणि हॉटेलबाहेर पोह्यांची रास घेऊन उभे असणारे विक्रेते दिसतात. या पोह्यांवर शेव, तिखट बुंदी, फरसाण टाकलं जातं. ओल्या खोबऱ्याचा किस आणि पिळलेलं लिंबू यांच्याबरोबरच स्पेशल ‘जीरावन’ हा मसाला येथील पोह्यांची लज्जत वाढवतो.दडपे पोहे हा पदार्थही महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. याशिवाय दहीहंडीच्या उत्सवात शाळेशाळेत दहीकाला वाटला जातो. यामध्ये पोहे असतात. दूध पोहे, दहीपोहे यांसारखे पदार्थही महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत.

    या पोह्यांना अनेक प्रांतात त्यांच्या भाषेत वेगवेगळी नावे आहेत तेलुगुमध्ये-अटुकूलु, तामिळ आणि मल्याळमध्ये- अवल, बंगाल आणि आसाममध्ये-चिडा, भोजपुरी आणि नेपाळीमध्ये- चिउरा, नेवाडीमध्ये-बाजी, कोंकणी-फोवू, कन्नडमध्ये- अवालक्की, गुजरातीमध्ये-पौआ ही नावं ऐकून तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटलं असेल. मात्र ज्या गुणकारी पोह्याची नावे इतकी अंतरंगी आहेत.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here