आगरी नेत्यांची राजकीय पलटी!
बाळासाहेबांच्या नावाला पाठिंबा देण्यासाठी शिवसेनेच्या पदरात घेतले पक्षासहित गुंडाळून
डबल ढोलकी नेत्यांविरूद्ध आगरी समाजात प्रचंड चीड
खारघर-सोगावकर – कालपर्यंत लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नावाचा विमानतळासाठी आग्रह धरणारे शेकाप, कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेच्या आगरी समाजातील नेत्यांनी एकाएकी पलटी मारून हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा आग्रह धरल्याने शिवसेनेने बोलाविलेल्या पत्रकार परिषदेतून स्पष्ट झाले. त्यात आगरी समाजातील ‘डबल ढोलकी’ नेत्यांनी पुन्हा एकदा दिबांच्या नावाशी दगाबाजी केल्याने त्यांच्याविरोधात प्रचंड रोष निर्माण झाला आहे.
सिडकोने आठशे एकर जागेत जवळपास साडेतीन हजार कोटी रूपये खर्च करून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम सुरू केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते शुभारंभ झालेल्या विमानतळाचे काम अंतिम टप्यात येताच शिवसेनेचे नेते नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे बाळासाहेबांचे नाव देण्याची मागणी केली. तेव्हापासून राज्यात नामकरणाचे वारे वाहू लागले. त्यानंतर सिडकोनेही बाळासाहेबांच्या नावाचा ठराव करून प्रकल्पग्रस्त, शेतकरी, दिबा समर्थकांच्या जखमेवर मीठ चोळले. तरीही दि. बा. पाटील यांच्यामुळे समाजात स्थान निर्माण झालेले सर्वपक्षिय राजकीय नेते मूग गिळून बसले होते.
कांतीलाल कडू यांची सत्य वाणी झोंबली अन्…
2 मे 2021 रोजी विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्यावरून पत्रकार सागर राजे यांनी त्यांच्या प्रभात पर्व यु ट्युब चॅनेलसाठी सामाजिक कार्यकर्ते कांतीलाल कडू यांची लाईव्ह मुलाखत घेतली आणि त्यांच्या प्रत्येक शब्दांतून पडलेल्या ठिणगीतून वणवा पेटत गेला…
दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे, अशी एकाही राजकीय नेत्याची धारणा नसल्याचा सणसणाटी आरोप कडू यांनी करून राजकीय नेत्यांच्या पुतणा मावशी प्रेमाचा पर्दापाश केल्यानंतर अनेकांना मिर्च्या झोंबल्या.
त्यानंतर लगेचच दुसर्यांदिवशी जासई, पनवेल, जासई येथे राजकीय नेत्यांनी अश्रू गाळायला सुरूवात केली. दि. बा. पाटील यांच्यावर तीस वर्षे निर्व्याज प्रेम करीत असल्याचे सांगत सर्व पक्षिय नेते एकत्र आले आणि आंदोलनाची तयारी सुरू केली.
मानवी साखळी आणि घेरावची तयारीः
विमानतळाचे काम सुरू झाल्यापासून राजकीय नेत्यांनी केलेल्या चुका अंगलट येत असल्याचे आणि त्यात समाजाचा दबाव आणि कांतीलाल कडू यांच्या शब्दांचा ठसका लागल्याने आंदोलनाला धार देण्याची योजना तयार झाली. स्थानिक भाजपा नेत्यांनी पुढाकार घेतला आणि सर्वपक्षिय नेत्यांची मोट बांधण्याचा प्रयत्न झाला. राज्यस्तरिय नेत्यांच्या गाठीभेटी सुरू झाल्या. गावोगावी आंदोलनाच्या बैठका सुरू झाल्या. रायगडपेक्षा ठाण्यातून जशास तसे उत्तर येवू लागले. आंदोलनापूर्वी तरूणांनी समाजमाध्यमांवरून रोष व्यक्त करत दि. बां. च्या नावाचा रेटा लावून धरला.
शिवसेनेचे नेते फुटलेः
दि. बां. च्या नावाला पाठिंबा आहे. आदर आहे, असे सांगून आगरी समाजाला चकवा देत शिवसेनेच्या नेत्यांनी कृती समितीमधून वेगळी चुल मांडली. खा. बारणे यांनी स्थानिक शिवसेना नेत्यांना मातोश्रीच्या आदेशाची आठवण करून देत थेट बाळासाहेबांच्या नावाचा आग्रह धरण्यास फर्मान काढले. शिवाय महाविकास आघाडीच्या नेत्यांनाही सोबत या म्हणावं, अन्यथा तुमच्याशिवाय…! असा इशारा मुंबईतून आल्याचा निरोप देण्यात आला. तत्पूर्वी दि. बा. पाटील कृती समितीच्या पत्रकार परिषदेसह बैठकांना उपस्थित असलेले आघाडीच्या नेत्यांनी कृती समितीची साथ सोडण्याची मनाची तयारी केली.
महाविकास आघाडी शिवसेनेच्या वळचणीलाः
आज शिवसेनेचे जिल्हा सल्लागार बबनदादा पाटील यांनी पत्रकार परिषद घेवून एक घाव दोन तुकडे करून टाकले. त्यांनी शेकाप, राष्ट्रवादी, कॉंग्रेस, समाजवादी पक्षाच्या नेत्यांची पत्रकारांसमोर साक्ष काढून दि. बां. चा आदर असल्याचे सांगत विमानतळाला मात्र नाव हिृदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचेच देणार असून त्यासाठी एकत्र आलो असल्याची ग्वाही दिली. तेव्हा आगरी समाज, बारा बलुतेदार, दि. बा. पाटील कृती समिती, पाच हुतात्मे, 1984 चे गौरवशाली आंदोलन आणि साडेबारा, साडेबावीस टक्केचे लाभार्थी अक्षरशः एकाकी पडल्याचे चित्र दिसू लागले.
आगरी समाजाचे राजकीय पलटी मारणारे नेतेः
आ. बाळाराम पाटील, माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, आर. सी. घरत, महेंद्र घरत, सुदाम पाटील, काशिनाथ पाटील, माजी आमदार मनोहरशेठ भोईर, जिल्हाप्रमुख श़िरीष घरत, अनिल नाईक आदी प्रमुख नेत्यांनी आगरी समाजाच्या शिखराला मूठमाती देवून राजकीय स्वार्थापोटी पलटी मारल्याचे उघड चित्र झाले.
आदी भाजापाने मारले आता महाविकास आघाडीनेः
लोकनेते दि. बा. पाटील अमर आहेत, अशी श्रद्धा अनेकांची आहे. परंतु, गेल्या तीस वर्षात आप्तस्वकीयांची वादळे अंगावर घेवून एक एक नेता घडवून त्याला सोनेरी मुलामा देणारे लोकनेते दि. बा. पाटील यांना भाजपाचे राज्यात मुख्यमंत्री असताना आणि सिडकोचे चेअरमन प्रशांत ठाकूर असताना त्यांनी सिडकोत ठराव न केल्याने दिबांचा मृत्यू ओढावला होता. असे वाटत असतानाच राजकीय मतलबी वारे वाहून अखेर शेकाप, कॉंग्रेस, राष्ट्रवादीनेही शिवसेनेच्या पदराखाली गुंडाळून घेतल्याने दि. बां. पाटील यांचा आज खर्या अर्थाने मृत्यू झाल्याची चर्चा पेटली आहे.






