पुण्यातील सॅनिटायझर कंपनीत अग्नितांडव; 18 कामगारांचा मृत्यू

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – सॅनिटायझर बनविणाऱ्या एसव्हीएस अॅक्वा टेक्नॉलॉजिस कंपनीत शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत 18 कामगारांचा होरपळून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सोमवारी सायंकाळी चारच्या सुमारास मुळशी एमआयडीसीतील उरवडे गावातील कंपनीत आग लागली होती. आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. अद्यापही काही बेपत्ता कामगारांची शोधमोहीम सुरू असून, मृतांची संख्या वाढण्याची भीती प्रशासनाने व्यक्त केली आहे. दरम्यान, मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केली आहे.

मुळशी एमआयडीसीतील उरवडे गावात एसव्हीएस अॅक्वा टेक्नॉलॉजिस कंपनी आहे. संबंधित कंपनीत सॅनिटायझरसह विविध उत्पादने तयार केली जातात. सोमवारी 40 ते 50 कामगार कंपनीत काम करीत होते. त्यावेळी शॉर्टसर्किटमुळे एका विभागात अचानक आग लागली. सॅनिटायझरमुळे आग वेगाने पसरल्यामुळे 37 कामगार अडकले होते. त्यानंतर एमआयडीसी आणि पीएमआरडीए अग्निशमन दलाच्या 9 गाडय़ा आणि 11 रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. मात्र, प्रचंड धुराच्या लोटामुळे आग विझविण्यात अडचण निर्माण झाली होती. अथक प्रयत्नानंतर जवानांनी आग विझवून बेपत्ता कामगारांची रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम सुरू ठेवली होती. रात्री आठ वाजेपर्यंत 18 कामगारांचे मृतदेह आढळून आले.

भीषण आगीत होरपळून कामगारांचा अक्षरशः कोळसा झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. रात्री उशिरापर्यंत मृतदेहांची ओळख पटली नव्हती. दरम्यान, आगीत होरपळून मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह ससून रुग्णालयात पाठविण्यात आल्याची माहिती उपविभागीय अधिकारी संग्राम शिर्के यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here