भर उन्हात आजीसोबत चालत जाणाऱ्या चिमुरडीचा पाण्याविना मृत्यू

जयपूर (राजस्थान) – पोळणाऱ्या उन्हात आजीसोबत पायी चालत जाणाऱ्या एका पाच वर्षांच्या मुलीचा पाण्याविना तडफडून मृत्यू झाल्याची घटना राजस्थानात घडली आहे. सुदैवाने पाऊस पडल्याने तिच्या आजीचा जीव वाचला आहे.

ही घटना रविवारी दुपारी घडली. मृत मुलीच्या आजीचं नाव सुखीदेवी असं आहे. ती आपल्या नातीसोबत राजस्थानातील रायपूर येथे गेली होती. तिथून रविवारी सकाळी दोघीही जणी निघाल्या. सकाळी वातावरणात गारवा असल्याने त्या दोघींनी पायीच चालत जाण्याचं ठरवलं.

दहा ते बारा किलोमीटरचा प्रवास करून त्या दोघी चालत आल्या. दरम्यान दुपारी ऊन डोक्यावर आल्याने दोघींना त्रास होऊ लागला. निघताना त्यांनी पाण्याची बाटली सोबत घेतली नव्हती. जिथून त्या दोघींचा प्रवास सुरू होता, तो रस्ता वाळवंटातील कच्चा रस्ता होता. त्यामुळे पाणी मिळण्याची कोणतीही सोय तिथे उपलब्ध झाली नाही.अखेर तीव्र ऊन आणि पाण्याच्या अभावामुळे त्यांना त्रास असह्य झाला आणि त्या बेशुद्ध पडल्या. खूप वेळाने तिथून जाणाऱ्या एका गुराखी महिलेने त्यांना पाहिलं आणि ताबडतोब गावच्या सरपंचांना फोन केला. सरपंच पोलिसांसह तिथे हजर झाले.

त्या दोघींना उठवण्याचा प्रयत्न केला असता मुलीचा मृत्यू झाल्याचं लक्षात आलं. सुदैवाने त्या दोघी बेशुद्ध पडल्यानंतर काही वेळाने पावसाची हलकी सर येऊन गेल्याने आजीचा जीव वाचला. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here