औरंगाबाद महापालिकेच्या आरोग्य केंद्रात चोरट्यांची ओली पार्टी

औरंगाबाद (जिल्हा प्रतिनिधी दत्तात्रय मोटे) – महापालिकेच्या कबीरनगरमधील आरोग्य केंद्रात चोरी झाल्याची घटना बुधवारी उघडकीस आली. चोरट्यांनी त्या ठिकाणी ‘ओली पार्टी’ही केल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेची माहिती मिळताच पालिकेचे अतिरिक्त आयुक्त बी. बी. नेमाने व आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी आरोग्य केंद्राला भेट दिली.

कबीरनगरात महापालिकेने दीड वर्षापूर्वी नव्यानेच आरोग्य केंद्र बांधले. बांधकाम पूर्ण झाल्यापासून ते बंदच होते. त्याचा वापर केला जात नव्हता. बंद असलेल्या आरोग्य केंद्राचा वापर आजूबाजूच्या वसाहतीमधील टवाळखोर गैरकृत्यांसाठी करीत होते, पण त्याची खबर इतके दिवस पालिका प्रशासनाला लागली नाही. दोन दिवसांपूर्वी या आरोग्य केंद्रात चोरी झाली आणि त्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाला कळाली. त्यामुळे बुधवारी नेमाने व पाडळकर यांनी केंद्राला भेट दिली तेव्हा दरवाजा तोडण्यात आल्याचे लक्षात आले. आरोग्य केंद्रात काही जुजबी साहित्य ठेवण्यात आले होते, त्याची चोरी झाल्याचे स्पष्ट झाले. खिडकीचे गज, नळाच्या तोट्यादेखील चोरीला गेल्या. आरोग्य केंद्राचा वापर काही मंडळी गैरकृत्यासाठी करीत असल्याचे एकूण परिस्थितीवरुन लक्षात आहे. ओल्या पार्ट्यादेखील या ठिकाणी रंगत होत्या असे स्पष्ट झाल्याचे सूत्रांनी सांगितले. आरोग्य केंद्राच्या परिसरात सुरक्षारक्षक तैनात करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला.

कबीरनगरातील आरोग्य केंद्र एक-दीड वर्षापूर्वी बांधण्यात आले आहे, पण करोनाकाळामुळे ते सुरु करण्यात आले नव्हते. त्याचा गैरफायदा काही मंडळींनी घेतला. आरोग्य केंद्राचे दार, खिडक्या तोडण्यात आल्या आहेत. काही साहित्याचीदेखील चोरी झाल्याचे लक्षात आले आहे. त्यामुळे येत्या आठ दिवसांत ते आरोग्य केंद्र सुरू करून तेथे ‘ओपीडी’ची व्यवस्था केली जाणार आहे. दोन सुरक्षारक्षकदेखील तैनात केले जातील, असे अतिरिक्त आयुक्त बी.बी. नेमाने यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here