छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी सुजित खंडाळे) । पैठण-अहिल्यानगर महामार्गावर असलेल्या पैठण येथील जिल्हा खुले कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या एका कैद्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी उघडकीस आली.
याबाबत समजलेली माहिती अशी की, शांतीलाल तान्हा ओझरे (वय ४४, रा. पालघर) असे असून तो बंदी क्रमांक सी-५५१३ आहे. सन २०२३ मध्ये नाशिक कारागृहातून त्याची पैठण येथील जिल्हा खुले कारागृहात बदली करण्यात आली होती. तो येथे नित्यनेमाने शेतीकाम करत आपली शिक्षा भोगत होता. गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे इतर बंदींना दिसून आले. त्यांनी तात्काळ ही बाब खुले कारागृहाचे अधीक्षक राजेंद्र निमगडे यांना कळवली. यानंतर प्रशासनाने त्वरित पैठण पोलीस ठाण्याचे निरीक्षक महादेव गोमारे यांना माहिती दिली.
दरम्यान, याची माहिती मिळताच नायब तहसीलदार राहुल बनसोडे, पोलीस निरीक्षक महादेव गोमारे, उपनिरीक्षक संभाजी खाडे व उपनिरीक्षक अजीज शेख यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात हलवण्यात आला आहे. शांतीलाल ओझरे याने आत्महत्या का केली, याबाबत अद्याप कोणतेही ठोस कारण समोर आले नाही.







