बॉलिवूडला आणखी एक धक्का, ज्येष्ठ अभिनेत्री कुमकुम यांचे निधन

योगेश शुक्ल (९६५७७०१७९२)
हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री कुमकुम यांचे आज (दि.२८) निधन झाले आहे. वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कुमकुम यांनी १०० हून जास्त चित्रपटांमध्ये काम केले आहे. कुमकुम यांचे सकाळी निधन झाले असून या संबंधीची अधिकृत माहिती नावेद जाफरी यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.
गेल्या काही दिवसांपासून कुमकुम या आजारी होत्या. मुंबईमध्ये लिकिंग रोडवर त्यांचा बंगला होता. ज्याचे नाव कुमकुम असे ठेवण्यात आले होते. पुढे तो बंगला जमीनदोस्त झाला आणि तिथे इमारत बांधण्यात आली. कुमकुम यांनी हिंदी सिनेसृष्टीतील अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. किशोर कुमार आणि गुरू दत्त यांच्यासोबतच कुमकुम यांचे अधिक चित्रपट आले आहेत.
त्यांचा जन्म हुसेनाबाद शेखपुरा या बिहारमधील ठिकाणी १९३४ मध्ये श्रीमंत परिवारात झाला. कुमकुम यांचे खरे नाव जैबुनिसा होते. गुरुदत्त यांनी चित्रपटसृष्टीकरिता त्यांना कुमकुम हे नाव दिले. वडील सैय्यद नबाब हुसेन हे पटनीचे नबाब होते. आईचे नाव होते खुर्शीद बानो. सरकारने सैय्यद हुसेन यांची मालमत्ता जप्त केल्यानंतर ते परिवारासह कलकत्त्याला गेले, पण तिथली हवा या कुटुंबाला मानवली नाही. कलकत्त्याला आल्यावर सैय्यद हुसेन यांनी दुसरे लग्न केले व पहिल्या पत्नीसह परिवाराला वाऱ्यावर सोडून ते पाकिस्तानला निघून गेले. कुमकुम यांना लहानपणापासूनच नृत्याची आवड होती. पंडीत शंभू महाराज यांच्याकडून त्यांनी कथक नृत्याचे प्रशिक्षण घेतले होते. हीच नृत्याची आवड त्यांना पुढे चित्रपटसृष्टीकडे घेऊन गेली. १९५३ आलेल्या मिर्झा गालिब या सोहराब मोदी यांच्या चित्रपटातील छोट्याश्या भूमिकेने त्यांनी रुपेरी पडद्यावर पदार्पण केले. यातील त्यांचे काम पाहून गुरुदत्त यांनी आपल्या आरपार या चित्रपटात त्यांना भूमिका दिली. १९५४ मध्ये आरपार या चित्रपटातील कभी आर कभी पार हे गाणे जगदीप यांच्यावर चित्रीत होणार होते पण नंतर गुरुदत्त यांनी या गाण्यात कुमकुम यांना घेतले. त्या चित्रपटातील अगदी छोटी असणारी भूमिका करण्यास कोणीही अभिनेत्री तयार नव्हती तेव्हा कुमकुम यांनी तयारी दर्शविली आणि एकाच गाण्यात त्यांच्यावर सफल अभिनेत्रीचा शिक्का बसला. त्यानंतर आलेल्या सीआयडी (१९५६) मध्ये यह है बॉम्बे मेरी जान या गाण्यातही कुमकुम यांची जादू चालली. हळूहळू छोट्या भूमिका करत त्यांची नायिकापदाकडे वाटचाल झाली. ‘मधुबनमें राधिका नाचे रें’ या गाण्यात शास्त्रीय नृत्य करून त्यांनी सर्वांनाच प्रभावित केले होते. . याशिवाय त्यांनी मिस्टर एक्स इन बॉम्बे (१९६४), मदर इंडिया (१९५७), सन ऑफ इंडिया (१९६२), कोहिनूर (१९६०), उजाला, नया दौर, श्रीमान फंटूश, एक सपेरा एक लुटेरा यांसारख्या सुपरहीट चित्रपटांमध्ये काम केले होते.
१९६३ मध्ये निर्मित झालेला पहिला भोजपुरी चित्रपट ‘गंगा मैय्या तोहे पियरी चढइबो’ या चित्रपटात त्यांनी काम केले होते. भारतीय चित्रपटाच्या इतिहासातील तो पहिला भोजपुरी चित्रपट होता. १९७५ मध्ये व्यावसायिक सज्जाद अहमद खान यांच्या निकाह झाल्यानंतर त्यांनी चित्रपटसृष्टीला निरोप दिला आणि सौदी अरबियाला राहण्यास गेल्या. तेथे काही काळ व्यतीत केल्यानंतर त्या कुटुंबियांसमवेत मुंबईला परतल्या होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here