5G नाही , 5Gi भारतात येणार, जाणून घ्या या नवीन तंत्रज्ञानाविषयी….

मुंबई (प्रतिनिधी चेतन किर्दत) – आजकाल 5G हा शब्द टेक जगतात टॉपवर ट्रेंड होत आहे. 5G स्मार्टफोन्स आधीच भारतीय बाजारात आले आहेत. आता तर भारत सरकारकडून 5G चाचण्यांना परवानगीही देण्यात आली आहे. रिलायन्स जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन आयडियासह बीएसएनएल आणि एमटीएनएलनेही त्यांचे 5G नेटवर्कच्या विस्ताराच्या दिशेने काम सुरू केले आहे. परंतु आपल्याला माहित आहे का की भारतात येत असलेल्या नवीन इंटरनेट तंत्रज्ञानाचे नाव 5G नसून 5Gi असेल? होय, संपूर्ण जग 5G इंटरनेटवर काम करेल, तर भारतातील लोक 5Gi चा वापर करणार आहेत. आता तुम्हांलाही हा प्रश्न पडला असेल की 5G आणि 5Gi मध्ये नक्की काय फरक आहे? भारत संपूर्ण जगापासून दूर हा 5Gi का लाँच करत आहे आणि भारतीय वापरकर्त्यांना 5Gi चा कसा फायदा होईल? म्हणून आम्ही या पोस्टद्वारे तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे पुढे देण्याचा प्रयत्न करणार आहोत, जेणेकरून 5Gi बद्दल सर्व तपशीलवार आपल्यापर्यंत पोहोचेल.

काय आहे 5Gi?

5Gi हे भारतीय निर्मितीचे म्हणजेच “Made In India 5G” आहे. या तंत्रज्ञानाची निर्मिती आयआयटी हैदराबाद आणि आयआयटी मद्रास यांनी मिळून केली आहे. भारतीयांना हे जाणून अभिमान वाटेल की भारतीय 5Gi ला आयटीयूने(ITU) म्हणजेच इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियनने मान्यता दिली आहे. महत्वाचे म्हणजे आयटीयूने आतापर्यंत जगभरात केवळ ३ कंपन्यांना मान्यता दिली आहे, ज्यात एक भारतीय 5Gi देखील आहे. हे तंत्रज्ञान त्याच बँडस आणि स्पेक्ट्रमवर काम करेल ज्यावर 5G कार्य करते. सोबतच ज्या फ्रिक्वेन्सीवर 5G काम करेल त्याच फ्रिक्वेन्सीवर 5Gi देखील काम करणार आहे. 5Gi मध्ये मिलीमीटर वेव्ह तंत्रज्ञानदेखील इम्प्लिमेंट केले जाऊ शकते, अशी माहिती दिली जात आहे.

5Gi चे फायदे

झपाट्याने प्रगती करणाऱ्या भारताच्या लोकसंख्येत आजही बहुतांश जनता ही खेड्यात राहते. आजही देशातील दुर्गम भागात अधिक चांगली नेटवर्क कनेक्टिव्हिटी उपलब्ध करून देणे आणि वेगवान 4G इंटरनेट पोहोचवणे हे आव्हान राहीलं आहे. 5Giसह देशातील गावांना चांगले नेटवर्क कव्हरेज देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. 5Gi तंत्रज्ञानाने जास्तीत जास्त क्षेत्राला हाय मिलीलिटर व्हेवशी कनेक्ट केले जाऊ शकते आणि ते बनवण्याचा खर्चही कमी आहे आणि वापर सोपा आहे.

5Giच्या मार्गात येणारे सर्वात मोठे अडथळे!

5G आणि 5Gi या दोघांची ही स्वतःची वैशिष्ट्ये आणि तंत्रे आहेत. परंतु भारतात 5Giच्या मार्गात येणारा सर्वात मोठा अडथळा म्हणजे त्याची किंमत. असे मानले जाते की देशात 5Gi लागू करणे खूप महाग असू शकते. 5G क्षेत्रात बरीच गुंतवणूक झाली आहे आणि आता केवळ 5Giसाठी नवीन टॉवर्स पुन्हा बसवले जाऊ शकत नाहीतच तर तंत्रज्ञान आणि डेटाच्या बाबतीत हे तंत्रज्ञान सुरू करणे पण महाग असल्याचे दिसते. दुसरीकडे, मोठ्या लोकसंख्येसाठी काम केल्यास खर्च जास्त असू शकत नाही, कारण मोठ्या प्रमाणात उत्पादनाचा खर्च अनेकदा कमी होतो, असा अंदाजही बांधला जात आहे.
खर्च तसेच 5G आणि 5Gi दरम्यान तंत्रज्ञानसुसंगततेचा अभाव ही देखील एक मोठी समस्या आहे. आतापर्यंत 5Giचे अपग्रेडेशन 5Gच्या अपग्रेडेशनच्या स्टँडर्डसशी पूर्णतः मॅच करण्यात यश आले नसून त्याला 5G सह काम करण्यापासून ही रोखत आहे.

किमतीसोबतच 5G आणि 5Gi मधील टेक्नॉलॉजी कॉम्पैटिबिलिटी न होणे ही पण एक मोठी समस्या आहे. मात्र, नजीकच्या भविष्यात हे तंत्रज्ञान अपग्रेड करून सक्षम केले जाईल, अशी अपेक्षा आहे. कारण 2G, 3G आणि 4G यांनाही अशी अडचण होती. त्यावेळी भारतात विकले जाणारे मोबाईल फोन परदेशात जाऊन तेथील नेटवर्कला आधार देऊ शकले नाहीत. परंतु नंतर टेक कंपन्यांनी मदरबोर्डला अपडेट केले, ज्यात सर्व बँडसचा सपोर्ट मिळू लागला असे COAI (सेलुलर ऑपरेशन्स असोसिएशन ऑफ इंडिया) चे DG, SP कोच्चर म्हणाले.

जिओ, एअरटेल आणि वीआयवर प्रतिक्रिया

भारत सरकारने देशात 5Gi ला लागू करण्याविषयी कंपन्यांशी चर्चा केली तेव्हा देशातील रिलायन्स जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया सारख्या टेलिकॉम कंपन्यांनी याला विरोध केला होता. किंबहुना एरिक्सन, नोकिया, सॅमसंग आणि क्वालकॉम सारख्या कंपन्या 5G साठी उपकरणे बनवत आहेत आणि त्यांच्याबरोबर यापूर्वीच टेलिकॉम कंपन्यांनी जागतिक 5G नेटवर्कच्या मार्गावर गुंतवणूक केली आहे, त्यामुळे या कंपन्या 5Giसाठी आपले भांडवल गुंतवण्यास टाळाटाळ करत होत्या. मात्र, भारतीय 5Gi कमी खर्चात आंतरराष्ट्रीय 5G सुविधा देऊ शकत असेल तर 5Gi मध्ये गुंतवणूक करण्यासही तयार असल्याचे जिओकडून सांगण्यात आले आहे.

स्मार्टफोन बाजारावर परिणाम

शाओमी, रिअलमी, ओप्पो, विवो, सॅमसंग, नोकिया, वनप्लस, पोको आणि अॅपलसह इतर मोबाइल ब्रँड्स ज्याने त्यांचे 5G फोन भारतात लाँच केले आहेत किंवा लाँच करण्याच्या तयारीत आहेत, त्यांनाही 5Gi च्या समस्या असणार आहेत. पण भारतात जर 5Gi डिप्लोय केले तर या स्मार्टफोनमधील 5G बँड 5Giला सपोर्ट करू शकणार नाही. म्हणजे हे सर्व 5G फोन निरुपयोगी ठरतील आणि फक्त 4G नेटवर्कवर चालवता येतील.

5Gi निश्चितच भारतासाठी मोठा फायदेशीर ठरणार असून भारताने स्वतःचे 5G नेटवर्क बनवले तर ती संपूर्ण जगासाठी एक मोठी उपलब्धि ठरेल. पण या क्षेत्रातील कंपन्या सध्या मेड इन इंडिया 5Gi आणि ग्लोबल 5G मध्ये अशा प्रकारे बदल करण्याच्या प्रक्रियेत आहेत की हे दोन्ही बँड एकत्रित काम करू शकतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here