ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) – नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) मालाड पूर्वच्या बेकरीत छापा टाकून गांजा केकचा पर्दाफाश केला. केकच्या आत गांजा टाकून त्याची नशा करण्याचा हा भारतातील नवा प्रकार समोर आला आहे. गांजा केकप्रकरणी एलस्टोन फर्नांडिस, जगत चौरसिया आणि एका तरुणीला अटक केली आहे. त्या तिघांना न्यायालयाने तीन दिवसांची एनसीबी कोठडी सुनावली आहे.
एनसीबीने मुंबईत ड्रग्ज तस्करांविरोधात धडक मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत ड्रग्ज तस्करी करणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या जात आहेत. तस्कर हे ड्रग्जसाठी नवनवीन आयडिया शोधून काढत आहेत. ड्रग्ज खरेदी-विक्रीसाठी सोशल मीडियाचा वापर होत असल्याने एनसीबी त्यावर लक्ष ठेवून आहे. काही दिवसांपूर्वी एनसीबीच्या अधिकऱ्यांना इन्स्टाग्रामवर गांजाच्या केकची जाहिरात दिसली. त्या जाहिरातीनंतर एनसीबीच्या पथकाने गोपनीय माहिती काढली. एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या पथकाने शनिवारी मालाड पूर्व परिसरातील फर्नांडिसच्या बेकरीवर छापा मारला. गांजामिश्रित पेस्ट्री विकत असताना फर्नांडिस आणि एका महिलेला एनसीबीने ताब्यात घेतले. ते दोघे गेल्या वर्षभरापासून गांजामिश्रित केक आणि पेस्ट्री तयार करून त्यांची विक्री करत असत. केकसाठी लागणारा गांजा हा चौरसिया देत असल्याची माहिती एनसीबीला मिळाली. त्या माहितीनंतर एनसीबीच्या पथकाने वांद्रे येथे कारवाई करून चौरसियाला ताब्यात घेतले.
एनसीबीला घटनास्थळी एक डायरी मिळाली आहे. त्या डायरीमध्ये काही सेलिब्रेटींचे नंबर असून त्याचा तपास एनसीबी करत आहे. कोणत्या सेलिब्रेटींना किती आणि कधी गांजाचे केक दिले होते हे तपासले जाणार आहे. फर्नांडिस आणि अटक करण्यात आलेली तरुणी परिचित असणाऱ्यांना गांजामिश्रित पेस्ट्री ही 400 रुपयांना तर नवीन असणाऱ्यांना एक हजार रुपयांना विकत असत.






