मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) – काळानुरूप पोलीस दलात महिलांची संख्या वाढू लागली. मात्र त्या तुलनेत पोलीस ठाण्यांमध्ये महिला अंमलदारांसाठी आवश्यक त्या बाबी वाढल्या नाहीत. परिणामी स्वतंत्र आराम कक्ष, टॉयलेटची सुविधा नसल्याने त्यांची प्रचंड गैरसोय होत असून हे चित्र आता लवकरच बदललेले दिसणार आहे.
प्रत्येक पोलीस ठाण्यात पुरुष अधिकारी, अंमलदारांसाठी स्वतंत्र कक्ष व टॉयलेटची सुविधा असते, मात्र महिला अंमलदारांसाठी अद्याप बऱयाच पोलीस ठाण्यांत स्वतंत्र कक्ष व टॉयलेटची सुविधा नसल्याने त्यांची गैरसोय होतेय. पोलीस दलात महिलांची संख्या वाढली, परंतु या सुविधा न वाढल्याने महिला अंमलदारांची अक्षरशः कुंचबणा होते. याचीच पोलीस आयुक्त हेमंत नगराळे, सहआयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी गंभीर दखल घेतली आहे. महिला अधिकारी व अंमलदारांची गैरसोय होऊ नये यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात महिला अंमलदारांसाठी स्वतंत्र कक्ष व टॉयलेटची उभारणी करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. बऱयाच पोलीस ठाण्यांत या कामाला सुरुवात झाली असून लवकरच उर्वरित पोलीस ठाण्यांतदेखील महिला अंमलदारांसाठी स्वतंत्र कक्ष व टॉयलेटची उभारणी करण्यात येणार आहे. यामुळे पोलीस ठाण्यात काम करणे महिलांना अधिक सोयीचे व आरामदायक होणार आहे.
काही ना काही कारणाने नागरिक पोलीस ठाण्यात येत असतात. त्यामुळे पोलीस ठाण्यात आल्यानंतर गचाळपणा तसेच भीतीदायक वातावरण नागरिकांना वाटू नये याकरिता पोलीस ठाण्यात टप्प्याटप्प्याने नूतनीकरण करण्यास सुरुवात झाली आहे. प्रत्येक पोलीस ठाण्यात स्वागत कक्ष तसेच पासपोर्ट डेस्कला कॉर्पोरेट लूक देण्यात आला आहे. यानंतर आता महिला अंमलदारांसाठी स्वतंत्र कक्ष व टॉयलेट उभारणीवर जोर देण्यात येत असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.






