नागपूर (प्रतिनिधी) – पोलीस स्टेशनसमोरच ट्रकला गळफास घेऊन ट्रक चालकाने आत्महत्या केल्याचा प्रकार नागपुरात घडला आहे. चोरीच्या आरोपाखाली गुन्हा दाखल झाल्यानंतर ट्रक चालकाने टोकाचं पाऊल उचललं. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास केला जात आहे.
नागपूर जिल्ह्यातील कोंढाळी पोलीस स्टेशनच्या समोर एका ट्रक चालकाने आपल्याच ट्रकला गळफास लावून आत्महत्या केली आहे. चोरीच्या आरोपाखाली काल रात्री कोंढाळी पोलीस स्टेशनमध्ये त्याच ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलीस त्याचा शोध घेत होते. अशोक जीतूलाल नागोत्रा (वय 40) असे त्या ट्रकचालकाचे नाव आहे. अशोक नागोत्रा चालवत असलेल्या ट्रकमधून 9 जूनला नागपूर जिल्ह्यातील सातनवरी शिवारातील बाजारगाव येथील पेट्रोल पंपाजवळून तेलाचे पिंप चोरीला गेले होते. घटनेच्या दिवशी अशोक नागोत्रा त्यांच्या ट्रकमध्ये तेलाचे पिंप घेऊन येत असताना ही घटना घडली होती.
ट्रान्सपोर्ट मालकाने यासंदर्भात पाच दिवसानंतर म्हणजे काल कोंढाळी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी अशोक नागोत्रा यांच्याविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करत त्यांचा शोध सुरु केला होता. मात्र रात्री उशिरापर्यंत अशोक नागोत्रा सापडले नव्हते. मंगळवारी सकाळी मात्र अशोक नागोत्रा पोलीस स्टेशन समोर पोलिसांनी आणून ठेवलेल्या त्यांच्याच ट्रकला गळफास लावलेल्या अवस्थेत दिसून आले. सध्या पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास केला जात आहे.






