सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून एम.ए. मराठीसाठी चक्क ५६ वर्षीय विद्यार्थिनीला चार सुवर्णपदके

पुणे (उपसंपादक वासंती देवळे) – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून एम.ए. मराठीसाठी चक्क ५६ वर्षीय विद्यार्थिनीला चार सुवर्णपदके मिळाली आहेत. कला, साहित्य व लेखनाची आवड असणाऱ्या पुण्यातील नीलिमा फाटक यांचे सर्वच स्तरावर कौतुक होऊ लागले आहे.

सामान्यत: वयाच्या ३० वर्षांपर्यंतच शिक्षण घेतले जाते. त्यानंतर नोकरी, व्यवसायात गुंतल्यावर पुन्हा शिक्षणाकडे शक्यतो वळत नाहीत. पण फाटक यांनी शिक्षण पूर्ण झाल्यावर, बँकेत ३० वर्षे नोकरी करून एम.ए. मराठीला प्रवेश घेतला. त्यामध्ये मन लावून अभ्यास करत चार सुवर्णपदके मिळविली. फाटक यांनी वाणिज्य शाखेची पदवी घेतल्यानंतर वकिलीचे शिक्षणही केले. त्यांना आधीपासूनच काव्यलेखन, साहित्य वाचनाची आवड होती. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यावर त्या बँकेत नोकरीसाठी रुजू झाल्या.

नोकरी करत असतांना त्यांनी आपले लिखाण, वाचन, कवितालेखन हे छंद थांबविले नाहीत. २०१९ मध्ये ‘नीलमाधव’ नावाचा कवितासंग्रह प्रकाशित झाला. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलांचे संगोपन करत असलेल्या स्नेहवन संस्थेशी त्या संलग्न आहेत. तीस वर्षे स्टेट बँकेत नोकरी केली. त्यानंतर वयाच्या ५४व्या वर्षी स्वेच्छानिवृत्ती घेतली. शालेय जीवनापासूनच त्यांना वाचन आणि कविता लेखनाची आवड होती. महाविद्यालयीन जीवनातही त्यांनी लेखन थांबवले नाही. त्यांची एक कविता मॉरिशसमधील इयत्ता नववीच्या मराठी अभ्यासक्रमात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here