पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – नवीन कात्रज बोगद्याजवळील जांभुळवाडी गावच्या हद्दीत मराठेशाही हॉटेल जवळ सहा वर्षाच्या मुलाचा मृतदेह मंगळवारी सायंकाळी आढळून आला. या मुलाचा गळा आवळून खून करत महामार्गाच्या कडेला मृतदेह टाकून दिल्याचे उघडकीस आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, आयान शेख (वय सहा वर्षे) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक जगन्नाथ कळस्कर यांनी सांगितले, की जांभुळवाडी गावच्या हद्दीत महामार्गाच्या कडेला एका मुलाचा मृतदेह नागरिकांना आढळला. त्यांनी तत्काळ त्याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. त्यावेळी त्या मुलाचा गळा आवळून खून करण्यात आल्याचे निष्पन्न झाले.
या मुलाचा शोध घेत त्याचे काही नातेवाईक आले होते. त्यामुळे त्याची ओळख पटविण्यात यश आले आहे. हा खून कोणी व का केला हे स्पष्ट झालेले नाही. दरम्यान, मुलाचा खून करून या ठिकाणी मृतदेह टाकला असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. त्यानुसार भारती विद्यापीठ पोलिसांची पथके तपास करत आहेत.






