अहमदनगर (प्रतिनिधी) – दरोड्याच्या गुन्ह्यातील सराईत गुन्हेगाराला स्थानिक गुन्हे शाखेने 12 तासांत अटक केली आहे. त्याच्या ताब्यातून एक लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. मीलन ऊर्फ मिलिंद ईश्वर भोसले (वय 23, रा. बेलगाव, ता. कर्जत, सध्या रा. वनकुटे, ता. पारनेर) असे आरोपीचे नाव आहे.
पारनेर पोलीस ठाण्यात 11 जून रोजी दरोड्याचा गुन्हा दाखल झाला होता. तपासादरम्यान हा गुन्हा मीलन भोसले व त्याच्या साथीदारांनी केला असून, सध्या ते वनकुटे, ढवळपुरी परिसरात फिरत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली होती. कटके यांच्या पथकाने वनकुटे, ढवळपुरी परिसरात फिरून आरोपीचा शोध घेतला असता, आरोपी भोसले सापडला. पोलिसांनी त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता, त्याने संदीप ईश्वर भोसले, मटक ईश्वर भोसले, पल्या ईश्वर भोसले, अटल्या ऊर्फ अतुल ईश्वर भोसले यांच्या साथीने हा गुन्हा केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून पाच ग्रॅम सोन्याचे डोरले, 2.5 ग्रॅमची सोन्याची नथ, चांदीचे दोन जोडवे, रोख एक हजार 150 रुपये, विनाक्रमांकाची दुचाकी, एक सुरा असा एकूण एक लाख एक हजार 850 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे, उपनिरीक्षक गणेश इंगळे, हेड कॉन्स्टेबल दत्तात्रय हिंगडे, सुनील चव्हाण, संतोष लोंढे, शंकर चौधरी, विशाल दळवी, दिनेश मोरे, संदीप पवार, रवी सोनटक्के, संदीप चव्हाण, रवींद्र घुंगासे, रणजित जाधव, सागर सुलाने, जालिंदर माने, रोहित येमूल, आकाश काळे, मेघराज कोल्हे, बबन बेरड, चंद्रकांत कुसळकर आदींच्या पथकाने ही कारवाई केली.






