२.७०० किलो वजनाचा अंदाजे २ करोड ७० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त
मुंबई (संपादक सुनिल पाटील) – व्हेल माशाची उलटी (अंबरग्रीस) ची विक्री करण्यासाठी मुलुंड येथे तीन व्यक्ती येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यावरून गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष ४ च्या मुलुंड पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तिघांना अटक केली असून, त्यांच्याकडून २ करोड ७० लाख रुपयांचा प्रतिबंधित अंबरग्रीस हा पदार्थ जप्त केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गोपनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार काही इसम हे संरक्षित प्राणी व्हेल माशाच्या उलटीची (अंबरग्रीस)ची विक्री करण्यासाठी मुलुंड येथे येणार असल्याचे समजले. अंबरग्रीस वन्य प्राणी सुरक्षा अधिनियमातंर्गत खरेदी विक्री करणे बेकायदेशर आहे. मिळालेल्या माहितीनुसार बोमाटे चाळ, सालपा देवी पाडा,बॉम्बे ऑक्सिजन कंपनीच्या मागे, पी.के.मुलुंड पश्चिम येथे छापा टाकला असता तीन व्यक्ती २.७०० किलो वजनाची व्हेल माशाची उलटी अंदाजे किंमत २ करोड ७० लाख रुपये आढळून आले.
पोलिस पथकासह असलेल्या मरीन बायोलॉजिस्टनी त्यांच्याकडील पदार्थ तपासून पाहिला असता तो व्हेल माशाची उलटी (अंबरग्रीस) असल्याचे निष्पन्न झाले. या तीनही आरोपितांना मुलुंड पोलिसांनी ताब्यात घेतले असून, विस्थागुरक्र ७६/२१ कलम २, ३९, ४४, ४८ (अ), ४९ (ब), ५७, ५१ वन्य प्राणी संरक्षण कायदा १९७२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास गु.प्र.शा., गु.अ.वि. कक्ष ४ ॲन्टॉपहिल मुंबई करीत आहेत.
ही कामगिरी पोलीस सहआयुक्त (गुन्हे) मिलिंद भारंबे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) एस.विरेश प्रभू, पोलीस उपआयुक्त (प्रकटीकरण) प्रकाश जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त (डी१ दक्षिण) सोपान निगोट यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक इंद्रजित मोरे, पोलीस निरीक्षक सूर्यमोहन बोलमवाड, सपोनि राजेश पाटील, सपोनि अजय बिराजदार, पो.ह.परब, पो.ह.साळुंखे, पो.ह.बल्लाळ, पो.शि. जगताप, पो.शि.चव्हाण तसेच वनविभागाचे अधिकारी राजेंद्र मगदुम, सुरेश वरक, नथूराम कोकरे, अमोल धागवट व मरीन बॉयोलॉजिस्ट हर्षद कर्वे यांनी पार पाडली.






