नवी दिल्ली – सीबीएसई बोर्डाने दहावी आणि बारावीच्या परिक्षेंच्या निकालाबाबत आज मोठी घोषणा केली आहे. सीबीएसई बोर्डाच्या दहावीच्या परिक्षेचा निकाल 20 जुलैला लागणार आहे. तर बारावीच्या परिक्षेचा निकाल 31 जुलै रोजी लागणार असल्याचं बोर्डाने सांगितलं आहे. तसेच बोर्डाने विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनासाठीचे सूत्र देखील आज जाहीर केले आहे.
सीबीएसई बोर्डाचे संयम भारद्वाज यांनी याबद्दल माहिती दिली आहे. ते म्हणाले की, दहावीच्या परिक्षेचा निकाल 20 जुलैला तर बारावीच्या परिक्षेचा निकाल 31 जुलैला लावण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. ज्या विद्यार्थ्यांना परदेशात शिकण्यासाठी जायचं आहे त्यांना काही अडचणी यायला नकोत म्हणून बोर्ड हा निर्णय घेत आहे.
तसेच बोर्डाने बारावीच्या विद्यार्थ्यांच्या मुल्यमापनासाठीचा फॉर्म्युला देखील आज सर्वोच्च न्यायालयात सादर केला आहे. सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या 40:30:30 या फॉर्म्युल्यानुसार बारावीच्या विद्यार्थ्यांचं मुल्यमापन होईल. 40:30:30 हा फॉर्म्युला कसा असेल याविषयी देखील माहिती देण्यात आली आहे.
दहावीमध्ये विद्यार्थ्यांच्या कामगिरीवर 30 टक्के मार्क देण्यात येतील. यामध्ये सर्वोत्कृष्ठ गुण असलेल्या तीन विषयांचा समावेश करण्यात येईल. त्यानंतर 30 टक्के गुण अकरावीच्या अंतिम परिक्षेत केलेल्या कामगिरीवर आधारित असतील. तर उरलेले 40 टक्के गुण बारावीत घेण्यात आलेल्या सर्व परिक्षांच्या गुणांवर देण्यात येतील.






