अल धफ्रा (यूएई) – संयुक्त अरब आमिरातीच्या (यूएई) अल धाफ्रा हवाईतळाजवळील समुद्रात इराणनं अनेक क्षेपणास्त्र डागली आहेत. गंभीर बाब म्हणजे या हवाईतळावर फ्रान्समधून आलेली भारताची पाच राफेल विमाने रात्रभर थांबली होती. याच हवाईतळाजवळील समुद्रात इराणनं क्षेपणास्त्र डागली असल्याचे वृत्त अमेरिकेतील मीडियाने दिले आहे. इराणनं क्षेपणास्त्र डागल्याने संपूर्ण हवाई तळावर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
हा हवाईतळ यूएईची राजधानी अबूधाबीपासून अगदी जवळ आहे. या हवाईतळावर अमेरिका आणि फ्रान्सचे सैन्य तैनात आहेत. फ्रान्समधून उड्डाण घेतल्यानंतर सात तासानंतर राफेल विमाने यूएईतील अल धाफ्रा तळावर उतरली होती. हरियाणातील अंबाला एअरबेसवर दाखल होण्यापूर्वी राफेल विमाने या हवाईतळावर रात्रभर थांबली आहेत. याच दरम्यान मंगळवारी हवाईतळाजवळील समुद्रात अनेक क्षेपणास्त्रे येऊन पडल्याने सुरक्षेच्या दृष्टीकोनातून हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच भारतीय पायलटांना सतर्क राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
अमेरिकेसोबत इराणचा वाद सुरु आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर इराणने यूएईच्या अल धाफ्रा हवाईतळाजवळ क्षेपणास्त्रे डागल्याची माहिती समोर आली आहे.







