पेण अर्बनच्या दोषींना कुरवाळणारे आ. प्रशांत ठाकूर कर्नाळाच्या ठेविदारांना तरी कसे पैसे मिळवून देणार?
पनवेल-सोगावकर – कर्नाळा नागरी सहकारी बँकेच्या ठेविदारांना हक्काचे पैसे परत मिळवून देण्यासाठी तसेच राज्य आणि केंद्र शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी (ता. 6 जुलै) कळंबोली येथील एमजीएम हॉस्पीटलसमोर सकाळी 10.30 वाजता ‘रास्ता रोको’ करण्याचा एकमुखी ठराव ठेविदारांनी केला.
आज, रविवारी (ता. 20) सकाळी 11 वाजता शहरातील ज्येष्ठ नागरिक सभागृहात कर्नाळा बँकेच्या शेकडो ठेविदारांची महत्वपूर्ण बैठक घेण्यात आली. त्यावेळी कांतीलाल कडू यांनी धारदार शब्दांनी भाजपा आमदार प्रशांत ठाकूर यांच्यावर जोरदार प्रहार करून त्यांचे वस्त्रहरण केले. बैठकीतून प्रभाकर उरणकर, टी. नम्रता, अशोक मुणोथ, रमेश महाले, राजाराम इनवटकर आदींनी सुचना केल्या. काही ठेविदारांनी थेट विचारलेल्या प्रश्नांना यथोचित उत्तरे कडू यांनी दिली.
व्यासपिठावरून कांतीलाल कडू, डॉ. चंद्रकांत गायकवाड (खारघर), रत्ना गणेश बडगुजर (नवीन पनवेल), प्रतिमा चंद्रकांत मुरबाडकर (पनवेल), विजय मेहता (महाड), समिर भगत (कामोठे), चंद्रकांत माने (खारघर) आदींनी मनोगत व्यक्त केले. गणेश वाघिलकर, विकी खारकर, किरण करावकर, भास्कर भोईर, हरेश पाटील, अकुंश म्हात्रे, सचिन पाटील, महेंद्र पाटील, योगेश पगडे आदी जण व्यासपिठावर उपस्थित होते. सभेचे सुत्रसंचालन भूषण साळुंके यांनी उत्तमरित्या केले.
ठाकूरांचे केले वस्त्रहरण!
पेण अर्बन बँकेच्या 700 कोटी रूपयांच्या घोटाळ्याला जबाबदार असलेल्या संचालकांना आ. प्रशांत ठाकूर यांनी भारतीय जनता पार्टीचे सदस्यत्व देवून पेण नगर परिषदेच्या निवडणूकीत भाजपा जिल्हाध्यक्ष या नात्याने उमेदवारी दिली. त्यांचा ‘शृंगार’ पूर्ण करताना ठाकूर यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा घेतली. इतक्यावरच ठाकूर थांबले नाहीत तर चक्क शेकापशी हातमिळवणी करून युती केली. तेव्हा पेण अर्बन बँकेच्या ठेविदारांच्या घरादारावर नांगर फिरवणार्यांना अभयहस्त देणारे आ. प्रशांत ठाकूर कुठल्या तोंडाने कर्नाळा बँकेच्या ठेविदारांना न्याय मिळवून देणार असल्याचे सांगतात, असा थेट प्रश्न पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी उपस्थित केला.
विवेक पाटील, बाळाराम पाटील भाजपात गेले असते
तर प्रशांत ठाकूर कर्नाळ्याचाही घोटाळा विसरले असते!
कुठेही भ्रष्टाचार झाला की, आ. प्रशांत ठाकूर बेंबीच्या देटापासून ओरडून मर्जीतल्या पत्रकारांसमोर गळा काढतात. पण पेणमध्ये त्यांनी काय केले? त्या दोषींवर मेहरनजर ठेवून तेथील ठेविदारांशी गद्दारीच केली. कालपर्यंत माजी आ. विवेक पाटील, आ. बाळाराम पाटील भाजपात गेले असते तर आ. प्रशांत ठाकूरांनी त्यांनाही शुर्चिभूत करून ठेविदारांशी प्रतारणा केली असते, असे सांगताना कडू म्हणाले की, कामोठे ग्रामपंचायतीचा भ्रष्टाचार ठाकूरांनी बाहेर काढला. ज्याच्यावर आरोप केले त्याला पक्षात घेवून जिल्हा उपाध्यक्षपद दिले. मग कुठे गेला भ्रष्टाचार? असा प्रश्न कडू यांनी त्यांना विचारला. तीच गत सुकापूरच्या पाणी प्रश्नाबाबत झाली. पाणी पुरवठा योजनेतील मुख्य आरोपीविरोधात जिल्हा परिषद सदस्याला उपोषणाला बसविले. त्यानंतर आरोपीलाच पक्षात घेवून भ्रष्टाचार मिटवून टाकला, असा घणाघात कडू यांनी करून प्रशांत ठाकूरांची पिसे उपटली.
खांदा द्यायला चौघेजण लागतात!
पनवेल संघर्ष समितीचे कार्य पाहून आ. प्रशांत ठाकूरांचे डोळे पांढरे झाले आहेत. त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. ईडीच्या कारवाईनंतर त्यांनी श्रेय घेण्यासाठी जिवाचा आटापिटा चालविला आहे. पत्रकार परिषदेत कांतीलाल कडू आणि संघर्ष समितीवर ठाकूरांनी टीकास्त्र सोडले होते. म्हणे कडू ठेविदारांची दिशाभूल करतात. चौघांचीच समिती आहे, वगैरे असे आकलेचे तारे त्यांनी तोडले.
त्यांचा परामर्श घेताना कडू म्हणाले, की देशाचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी पनवेल संघर्ष समितीच्या पत्राची दखल घेवून कर्नाळा बँकेसंदर्भात केंद्रिय अर्थमंत्रालयाच्या सचिवांना आदेश दिले आहेत. ते भाजपाचे पूर्व राष्ट्रीय अध्यक्ष होते. राज्यातील अनेक मंत्र्यांसह प्रधान सचिवांनी दखल घेवून कर्नाळा बँकेच्या प्रकरणात सहकार्य केले. आता ईडीने माजी आमदार विवेक पाटील यांच्यावर अटकेची कारवाई केली. त्या संघर्ष समितीची आ. प्रशांत ठाकूरांना का भीती वाटते ते कळत नाही. त्यामुळे संघर्ष समिती फक्त चौघांचीच असल्याचे ते सांगतात. तेव्हा खांदा द्यायला चौघांचीच गरज असल्याच्या हिंदू संस्कृतीचे महत्वही कडू यांनी पटवून देत ठाकूरांचे मार्मिकपणे वस्त्रहरण केले.






