- मार्कांचा पडला पाऊस
- कोकण विभाग ठरला अव्वल
- निकाल थेट 18 टक्क्यांनी वाढला
पुणे – राज्य शिक्षण मंडळाने मार्च महिन्यात घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल बुधवारी (२९ जुलै) जाहीर झाला आहे. ऑनलाईन पद्धतीने निकाल जाहीर करण्यात आला असून राज्याचा दहावीचा निकाल ९५.३० टक्के लागला आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा निकालात १८.२० टक्क्यांनी वाढ झाली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनी निकालातील बाजी मारली आहे. राज्यात सर्वाधिक ९८. ७७ टक्के निकाल कोकण विभागाचा लागला असून सर्वात कमी ९२.०० निकाल औरंगाबाद विभागाचा लागला आहे. कोरोनाच्या काळातही मंडळाच्या अधिकारी,कर्मचाऱ्यांनी व शिक्षकांनी निकाल तयार करण्याचे काम सुरू ठेवल्यामुळे २९ जुलै रोजी दहावीचा निकाल जाहीर करणे शक्य झाले.
यंदा दहावीचा निकाल हा थेट 18 टक्क्यांनी वाढला आहे. हा निकाल वाढण्यामागचं नेमकं कारण समोर आलं आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी काही दिवसांपूर्वी परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. तर काही ठिकाणी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्यामुळेच यावर्षी SSC चा भूगोलाचा पेपर रद्द करण्यात आला. मुलांना त्या विषयाचे सरासरी गुण देण्यात आले आहेत. तसेच अंतर्गत मूल्यमापन, कृतीपत्रिका आणि भूगोलाचे सरासरी गुण यामुळे यावर्षी निकाल जास्त लागला. राज्यात फक्त ५ टक्के मुलं नापास झाली आहेत अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी दिली आहे.
विभागवार लागलेला निकाल कोकण – 98.77 टक्के, पुणे – 97.34 टक्के, नागपूर – 93.84 टक्के, औरंगाबाद – 92 टक्के, मुंबई – 96.72 टक्के, कोल्हापूर – 97.64 टक्के, अमरावती – 95.14 टक्के, नाशिक – 93.73 टक्के, लातूर – 93.09 टक्के
राज्यातील १५ लाख ८४ हजार २६४ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यातील परीक्षेस प्रविष्ट झालेल्या १५ लाख ७५ हजार १०३ विद्यार्थ्यांपैकी १५ लाख १ हजार १०५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.







