तेहरान – इराणमध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये न्यायसंस्थेचे प्रमुख आणि कट्टरपंथीय गटाचे उमेदवार इब्राहिम रईसी यांनी एकतर्फी विजय नोंदवला. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या नेतृत्वाखालील समितीने रईसी यांच्या प्रमुख प्रतिस्पर्ध्यांना अपात्र ठरवले होते. त्यामुळे, या निवडणुकीतील चुरस संपुष्टात आली होती आणि इतिहासातील सर्वांत कमी मतदानाची नोंदही या निवडणुकीत झाल्याचे मानण्यात येत आहे.
रईसी यांना एक कोटी ७८ लाख मते मिळाली, तर त्यांचे नजीकचे प्रतिस्पर्धी आणि रिव्होल्युशनरी गार्डचे माजी कमांडर मोहसीन रेझाई यांना ३३ लाख मते मिळाली. मध्यममार्गी अब्दलनासीर हिम्मती यांना २४ लाख मते मिळाली. चौथ्या क्रमांकावर राहिलेल्या अमीरहुसेन हाशेमी यांना १० लाख मते मिळाली, असे प्राथमिक आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. रेझाई आणि हिम्मती यांनी सोशल मीडियावरून रईसी यांचे अभिनंदन केले आहे. ‘देशाची अर्थव्यवस्था आणि नागरिकांचे जीवन सुधारेल,’ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
रईसी हे खामेनी यांचे कट्टर समर्थक मानले जातात आणि त्यांचा विजय निश्चित करण्यासाठीच पाच प्रमुख उमेदवारांना अपात्र ठरवण्यात आल्याचे मानण्यात येते. त्यामुळेच, माजी अध्यक्ष मेहमूद अहमदीनेझाद यांच्यासह अनेक नेत्यांनी या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन मतदारांना केले होते. करोनाचा प्रादुर्भाव आणि ढासळलेली अर्थव्यवस्था या दोन प्रमुख समस्यांनी इराण ग्रस्त आहे.
या निवडणुकीत अध्यक्षपदावर येणारी नेत्याला सलग दोन टर्म अध्यक्ष पदावर राहता येणार आहे. विशेषतः इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी ८२ वर्षांचे होत आहेत. त्यांच्यानंतर सर्वोच्च नेता कोण होणार, याचीही इराणमध्ये चर्चा आहे. यासाठी रईसी यांच्याबरोबरच खामेनी यांचे पुत्र मोजताबा यांच्या नावाचीही चर्चा आहे.






