नवी दिल्ली – इराणच्या राष्ट्रपती पदाच्या निवडणूक निकालानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इराणचे नवनिर्वाचित राष्ट्रपती इब्राहिम रईसी यांचे अभिनंदन केले आहे. शनिवारी जाहीर झालेल्या निवडणूक निकालात कट्टरपंथी गटाचे उमेदवार रईसी यांनी एकतर्फी विजय मिळवला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इब्राहिम रईसी यांना शुभेच्छा देताना म्हटले की, इराणच्या राष्ट्रपतीपदी विजयी झाल्याबद्दल इब्राहिम रईसी यांचे अभिनंदन. भारत आणि इराण यांच्यातील संबंधांना आणखी मजबूत करण्यासाठी एकत्रपणे काम करू असे पंतप्रधान मोदींनी म्हटले.
Congratulations to His Excellency Ebrahim Raisi on his election as President of the Islamic Republic of Iran. I look forward to working with him to further strengthen the warm ties between India and Iran.
— Narendra Modi (@narendramodi) June 20, 2021
रईसी हे खामेनी यांचे कट्टर समर्थक मानले जातात आणि त्यांचा विजय निश्चित करण्यासाठीच पाच प्रमुख उमेदवारांना अपात्र ठरवण्यात आल्याचे मानण्यात येते. त्यामुळेच, माजी अध्यक्ष मेहमूद अहमदीनेझाद यांच्यासह अनेक नेत्यांनी या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन मतदारांना केले होते. करोनाचा प्रादुर्भाव आणि ढासळलेली अर्थव्यवस्था या दोन प्रमुख समस्यांनी इराण ग्रस्त आहे.
रईसी यांना एक कोटी ७८ लाख मते मिळाली, तर त्यांचे नजीकचे प्रतिस्पर्धी आणि रिव्होल्युशनरी गार्डचे माजी कमांडर मोहसीन रेझाई यांना ३३ लाख मते मिळाली. मध्यममार्गी अब्दलनासीर हिम्मती यांना २४ लाख मते मिळाली. चौथ्या क्रमांकावर राहिलेल्या अमीरहुसेन हाशेमी यांना १० लाख मते मिळाली, असे प्राथमिक आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. रेझाई आणि हिम्मती यांनी सोशल मीडियावरून रईसी यांचे अभिनंदन केले आहे. ‘देशाची अर्थव्यवस्था आणि नागरिकांचे जीवन सुधारेल,’ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.






