नागपूर (प्रतिनिधी) – येथील पाचपावली परिसरात एकाच कुटुंबातील पाच जणांची हत्या करुन एका व्यक्तीनं गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. आरोपीनं पत्नी, मुलगा, मुलगी यांच्यासह सासू आणि मेहुणीची हत्या केली आहे. सासू आणि मेहुणीची हत्या केल्यानंतर आरोपीनं घरी येऊन गळफास घेत आत्महत्या केली आहे. कौटुंबिक वादातून हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, आलोक माथुरकर असं आरोपीचं नाव असून याने त्याची पत्नी विजया, मुलगी परी आणि मुलगा साहिल यांची त्याच्या स्वतःच्या घरात, तर शंभर फुटावर रोडच्या पलीकडे असलेल्या दुसऱ्या घरात सासु लक्ष्मी देविदास बोबडे आणि मेहुणी अमिषा यांची निर्घुण हत्या केली. आरोपीने सासू आणि मेहुणीला गळा चिरून ठार मारले तर पत्नी मुलगी आणि मुलाची डोक्यावर हातोड्याने फटके मारून हत्त्या केली. त्यानंतर त्याने स्वतः गळफास लावून घेतला.
पहाटेच्या वेळेस ही घटना घडली असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. मात्र दुपारी १२ च्या सुमारास या हत्याकांडाची बातमी उपराजधानीत पसरल्यानंतर शहरात खळबळ माजली होती.






