शरद पवार इन ॲक्शन; भाजपविरोधात मोर्चेबांधणी सुरू

नवी दिल्ली – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सध्या दिल्लीत आहेत. शरद पवार यांनी उद्या म्हणजेच मंगळवारी विरोधी पक्षांची महत्त्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीला 15 पक्षांचे नेते सामील होणार असल्याची माहिती मिळतेय. या बैठकीत राष्ट्रमंच या बॅनरखाली एकत्र येण्यावर चर्चा होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. शरद पवार यांच्या निवासस्थानी ही बैठक होणार आहे. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

उद्या मोदी सरकारच्या धोरणांविरोधात राष्ट्र मंचाची उद्या 4 वाजता दिल्ली येथे बैठक होणार आहे. शरद पवार पहिल्यांदाच बैठकीत भाग घेतील. 2018 मध्ये यशवंत सिन्हा यांनी राष्ट्र मंच स्थापन केला. सिन्हा आता टीएमसीचे उपाध्यक्ष आहेत.

शस्त्रक्रियेनंतर गेल्या काही दिवसांपासून आपल्या मुंबईतील निवासस्थानी विश्रांती घेणारे शरद पवार रविवारी रात्री दिल्लीत पोहचले. 23 जूनपर्यंत ते दिल्लीतच असणार आहेत. शरद पवार यावेळी देशातील राजकीय स्थितीवर तसंच आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाविरोधात विरोधकांना एकत्र आणत रणनीती आखण्यासंबंधी विरोधी पक्षातील नेत्यांची भेट घेऊन चर्चा करण्याची शक्यता आहे.

शरद पवारांनी काँग्रेसप्रणित यूपीएचं नेतृत्त्व करावं, अशी भूमिका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अनेकदा मांडली आहे. मात्र काँग्रेस याबद्दल फारशी उत्सुक नाही. आता शरद पवारांनी दिल्लीत विरोधकांना एकत्र आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे पवार तिसरी आघाडी तयार करत आहेत का, अशी चर्चा दिल्लीत सुरू झाली आहे. २०२४ च्या लोकसभेआधी भाजपविरोधात महाआघाडीची गरज असल्याचं विधान काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केलं होतं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here