मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) – मुंबईत कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आली आहे. मुंबईत कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी पालिका प्रशासनाकडून विविध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. अशातच कोरोनाच्या काळात रस्त्यावर विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर पालिकेनं कारवाईचा बडगा उगारला होता. या कारवाईत मुंबई पालिकेनं तब्बल ५८ कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे.
२३ जूनपर्यंतच्या आकडेवारीनुसार, मुंबई पोलीस आणि रेल्वेने वसूल केलेल्या दंडाची एकूण रक्कम ५८ कोटी ४२ लाख ९९ हजार ६०० रुपये इतकी आहे. हा आकडा एप्रिल २०२० ते २३ जून २०२१ पर्यंतचा आहे. पालिकेनं विना मास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करतांना प्रत्येकी २०० रुपये दंड ठोठावला आहे.
एकट्या महापालिकेनं ५०.२९ कोटी रुपयांचा दंड वसूल केला तर मुंबई पोलिसांनी ७.६ कोटी रुपये वसूल केले. रेल्वेनं ५०.३९ लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. त्यापैकी मध्य रेल्वेने २१.१८ लाख रुपये, पश्चिम रेल्वेने २२.६३ लाख आणि हार्बर रेल्वेने ६.५ लाख रुपये दंड वसूल केला आहे.






