कोरोना काळातील जनसेवेच्या कार्याची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल
मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे हाहाकार उडालेला असतानाच पारनेरमधील नागरिकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी उभारलेलं एक हजार बेड्सचं करोना केंद्र साऱ्या महाराष्ट्रातच नाही तर देशभरामध्ये चर्चेचा विषय ठरलं. लंके यांच्या या कामाची दखल आता थेट आंतरराष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली असून त्यांना एक प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आलाय. यासंदर्भातील माहिती निलेश लंके यांनीच सोशल नेटवर्किंगवरुन फोटो शेअर करत दिली आहे. गुरुवारी दुपारी १ वाजता मुंबई येथील कार्यक्रमात आमदार लंके यांना स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन संस्थेच्या वतीने गौरवण्यात आलं.
कोरोना कालावधीमध्ये केलेल्या कामाबद्दल आपल्याला पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याचं लंके यांनी ट्विटरवरुन म्हटलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी पुरस्कार म्हणून देण्यात आलेलं प्रमाणपत्र स्वीकारत असल्याचा फोटो पोस्ट केलाय. “कोरोना काळात केलेल्या कामाबद्दल आज मला वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स लंडन या आंतरराष्ट्रीय पुरस्कराने सन्मानित करण्यात आले. माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातून आलेल्या व्यक्तीला हा सन्मान मिळाला ही खूप मोठी गोष्ट आहे. हे सगळं शक्य झालं माझ्यावर प्रेम कऱणाऱ्या मायबाप जनतेमुळे आणि सहकाऱ्यांमुळे”, असं लंके यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
कोरोना काळात केलेल्या कामाबद्दल आज मला वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स लंडन या आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. माझ्या सारख्या सामान्य कुटुंबातून आलेल्या व्यक्तीला हा सन्मान भेटला ही खुप मोठी गोष्ट आहे. हे सगळे शक्य झाले माझ्यावरती प्रेम करणाऱ्या मायबाप जनतेमुळे व सहकारी pic.twitter.com/NjPLn44CSC
— Nilesh Lanke – निलेश लंके (@Nilesh_LankeMLA) June 24, 2021
‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स’ मध्ये समावेश झाल्याने आमदार लंके यांनी करोना संकटकाळात केलेल्या सातत्यपूर्ण कामाला जागतिक परिमाण प्राप्त झाले आहे. करोना संसर्गाच्या काळात उल्लेखनीय काम केलेल्या मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर,अभिनेता सोनू सूद यांचा ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स, लंडन’मध्ये यापूर्वीच समावेश झाला आहे.






