मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) – ईडीकडून आज सकाळपासून चार वेगवेगळ्या ठिकाणी धाड टाकण्यात आल्या आहेत. त्यामध्ये राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांचाही समावेश आहे. अनिल देशमुख यांच्या मुंबई आणि नागपूर या ठिकाणच्या घरी ईडीने छापेमारी केली आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ईडीच्या अधिकाऱ्यांनी मुंबईतील १० ते १२ बार मालकांचे जबाब नोंदवले आहेत. या बार मालकांनी आपण हप्ता दिल्याची कबुली ईडीच्या अधिकाऱ्यांना दिली आहे. १० ते १२ मालकांनी मिळून काही महिने चार कोटी रुपये हप्ता दिल्याची कबुली दिली आहे. या जबाबानंतर ईडीच्या अधिकाऱ्यांकडून आज दिवसभर विविध ठिकाणी कारवाई सुरू असल्याचं बोललं जात आहे.
दरम्यान, बार मालकांनी दिलेल्या या जबाबात अनिल देशमुख यांचे नाव घेतले की नाही, तसेच त्यांचा या प्रकरणात संबंध आहे की नाहीये हे अद्याप स्पष्ट झालेले नाहीये. मात्र, परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांनंतर ईडीच्या पथकाकडून जी कारवाई सुरू आहे त्यावरुन अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ होत असल्याचं दिसत आहे.






