पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांचे वक्तव्य
मुंबई (उपसंपादक दिलीप दळवी) – ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देण्यात येणारा एफ आर पी च्या धर्तीवर राज्यातील कष्टकरी दूध उत्पादक शेतकऱ्यांना हमी भाव देण्याचा शासन प्रयत्न करणार असल्याचे पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी सांगितले.
मंत्रालयात आज दूध उत्पादक शेतकरी आणि संघटना यांच्या दूध दर वाढ आणि इतर विविध समस्यांबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार सदाभाऊ खोत,माजी आमदार ॲड.अनिल बोंडे, डॉ. किरण लहामटे, महानंदचे अध्यक्ष रनजितसिंग देशमुख,पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार,महानंदचे व्यवस्थापकीय संचालक शामसुंदर पाटील, दुग्ध व्यवसाय विकास विभागाचे आयुक्त एच पी तुम्मोड यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी श्री केदार म्हणाले, दूध उत्पादक शेतक-यांना एफ आर पी लागू करण्यासाठी दूध उत्पादक शेतकरी प्रतिनिधी, शासकीय आणि खाजगी दूधसंघ यांच्या सुचना ऐकून घेतल्या आहेत. लगेचच याविषयीच्या सर्व बाजूंचा अभ्यास करण्यात येणार असून याबाबत निर्णय घेऊन अमंलबजावणीची प्रक्रिया करण्यात येणार असल्याचे सांगितले.
राज्यात गेल्या दोन वर्षापासून लाँकडाऊनमुळे दूध दराचा प्रश्न सातत्याने निर्माण होत आहे. याकालावधीत शासनाने ग्रामीण भागातील कष्टकरी दूध उत्पादक शेतकरी यांना मदत करण्यासाठी जास्तीचे दूध खरेदी केले आणि त्याची पावडर तयार केली. 10 लाख लिटर दूध खरेदी करण्याचे शासनाने उदिष्ट ठेवले होते. राज्यातील शेतकऱ्यांची या निर्णयमुळे लाँकडाऊनची तिव्रता कमी करण्यात शासनाला यश आले.
याबैठकीस किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले, रयत क्रांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शिवनाथ जाधव, दीपक भोसले, भानुदास शिंदे, पांडुरंग शिंदे, सुहास पाटील, शेतकरी नेते धनंजय धोरडे, उमेश देशमुख, खासगी दूध संघाचे प्रमुख दशरथ माने, प्रकाश कुतावळ बैठकीला उपस्थित होते.






