राजर्षींच्या विचारांवरच राज्याची वाटचाल सुरु असल्याचा अभिमान – उपमुख्यमंत्री अजित पवार

ajit-pawar
  • राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिवादन
  • सामाजिक न्यायदिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून शुभेच्छा
  • राजर्षी शाहू महाराजांचे सामाजिक न्यायाचे विचार सदैव मार्गदर्शक

मुंबई (उपसंपादक दिलीप दळवी) – सामाजिक न्यायाचे प्रणेते, आरक्षणाच्या संकल्पनेचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे सर्वकालिन आदर्श राजे होते. त्यांचे सामाजिक न्यायाचे विचार मार्गदर्शक असून त्या विचारांवरच राज्याची आजही वाटचाल सुरु आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याचे स्मरण करुन त्यांना आभिवादन केले. उपमुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती आणि सामाजिक न्याय दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

उपमुख्यमंत्री शुभेच्छा संदेशात म्हणतात, शाहू महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा रयतेच्या कल्याणाचा वसा व वारसा समर्थपणे पुढे नेत उपेक्षित, वंचित घटकांना मानसिक गुलामगिरीतून बाहेर काढण्यासाठी सामाजिक न्यायाचा क्रांतिकारक विचार दिला. बहुजन समाजातील मुलांसाठी वसतिगृहे सुरु केली. शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी धरणे बांधली. बहुजनांना शिक्षण, जातिभेद निर्मूलन, नोकऱ्यांमध्ये आरक्षण, स्त्रीमुक्तीसाठी कायदे करणारे राजर्षी शाहू महाराज हे देशातील थोर समाजसुधारक होते. महात्मा ज्योतिबा फुले यांचा सत्यशोधक विचार त्यांनीच खऱ्या अर्थानं पुढे नेला.

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना शिक्षणासाठी मदत केली, त्यांना प्रोत्साहन दिले. बहिष्कृत बांधवांच्या हक्कासाठी ऐतिहासिक मानगाव परिषदेचं आयोजन केले. अंधश्रद्धा निर्मुलन, अस्पृश्यता निवारणाचं काम केले. अनिष्ट प्रथा, वाईट रुढी, चुकीच्या परंपरांवर बंदी घातली. आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देत, राज्यात त्यासंबंधीचा कायदा केला. सामाजिक न्यायाचे, आरक्षणाच्या संकल्पनेचे जनक असलेले राजर्षी शाहू महाराज यांच्या पुरोगामी, प्रगत, दूरदृष्टीपूर्ण विचारांमुळे राजर्षी शाहू महाराजांचे विचार आपल्यासाठी नेहमीच मार्गदर्शक, प्रेरणादायी आहेत, असे सांगत उपमुख्यमंत्र्यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना विनम्र अभिवादन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here