लखनऊ (उपसंपादक सय्यद गुलाम हुसैन) – लग्नानंतर दोनच दिवसात नवविवाहितेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. धक्कादायक म्हणजे गँगरेप करणारे दुसरे-तिसरे कोणी नसून तिचा पती, दोन दीर आणि इतर नातेवाईकच होते. अत्याचाराचा कळस म्हणजे तिच्या लैंगिक अवयवांना गरम चटके देऊन काठीही घालण्यात आली. या घटनेने उत्तर प्रदेशातील बदायूं जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
पीडितेच्या लग्नाला जेमतेम दोन दिवस झाले होते. नवऱ्यासोबत सुखी संसाराची स्वप्नं ती रंगवत होती. मात्र तिचा स्वप्नभंग करणारे राक्षस तिच्याच सासरी दीरांच्या रुपात लपून बसले होते. उत्तर प्रदेशातील बदायूं जिल्ह्यात जरीफनगर भागात ही घटना घडली. उस्मानपूरमध्ये राहणाऱ्या युवकासोबत 22 जूनला तरुणीचा विवाह झाला होता. मात्र मनाजोगता हुंडा न मिळाल्याने सासरची मंडळी नाराज होती.
पीडितेच्या आरोपानुसार सासरी सहा ते सात जणांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. बलात्काऱ्यांमध्ये तिचा पती आणि दोघा मोठ्या दीरांचा समावेश होता. धक्कादायक म्हणजे गँगरेप करायला तिच्या दोन नणंदा आणि जावाही प्रोत्साहन देत होत्या. सासरच्या मंडळींचं मन न भरल्यामुळे त्यांनी तिच्या गुप्तांगात काठी घालून गरम चटकेही दिले. पीडितेच्या वडिलांनी सासरच्या मंडळींवर हुंड्यासाठी छळ आणि सामूहिक बलात्काराची तक्रार दिली आहे. पीडितेच्या पतीला पोलिसांनी अटक केली असून अधिक तपास सुरु आहे.







