मुंबई (प्रतिनिधी रक्षा गोराटे) – भारतीय महिला संघातील खेळाडू मिथाली राज हिचा जगातील नामवंत महिला खेळाडूंमध्ये समावेश होतो. मिथाली हिने आपल्या कारकिर्दीदरम्यान अनेक मैलाचे दगड पार केले असून भारतीय महिला संघाला यशोशिखराव नेण्यामध्ये तिचा मोठा वाटा आहे. याच मिथालीने एक नवा माइलस्टोन गाठला असून टीम इंडियाचा माजी खेळाडू, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलनंतर अशी कामगिरी करणारी ती जगातील दुसरी खेळाडू ठरली आहे.
मिथाली राज २६ जून, १९९९ ला आयर्लंडविरुद्ध आपला पहिला एक दिवसीय सामना खेळली होती. आता तिने एक दिवसीय क्रिकेट कारकिर्दीतील २२ वर्ष तिने पूर्ण केली आहेत. सचिन तेंडुलकरनंतर अशी कामगिरी करणारी ती दुसरी खेळाडू आहे. सचिन तेंडुलकर याने १८ डिसेंबर, १९८९ ला आपला पहिला सामना आणि १८ मार्च २०१२ ला शेवटचा सामना पाकिस्तानविरुद्ध खेळला होता. सचिनने २२ वर्ष ९१ दिवसांच्या कारकिर्दीमध्ये अनेक विक्रम आपल्या नावे केले.
मिथालीच्या नावे असणारे विक्रम
एक दिवसीय क्रिकेटमध्ये ६ हजार धावांचा टप्पा पार करणारी मिथाली जगातील पहिली महिला खेळाडू आहे. २०१६ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम करणारी इंग्लंडची खेळाडू चार्लोट एडवर्डस हिच्या नावावर ५ हजार ९९२ धावांची नोंद असून ती दुसऱ्या स्थानावर आहे.
भारताकडून आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये २ हजाराहून अधिक धावा करणारी ती पहिली महिला खेळाडू आहे.
२०० एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळणारी देखील ती पहिली महिला खेळाडू आहे.
आयसीसीच्या वन डे विश्वचषकाच्या अंतिम लढतीत दोनदा (२००५ आणि २०१७) भारताचे कर्णधारपद भूषवणारी मिथाली पहिली खेळाडू आहे.
महिलांच्या आंतरराष्ट्रीय कसोटी लढतीत २०० धावा करणारी मिथाली पहिली खेळाडू आहे. २००२ ला इंग्लंडविरुद्ध तिने २१४ धावांची खेळी केली होती.






