शेतीच्या वादावरून कुटुंबावर सशत्र हल्ला; तीन जण गंभीर जखमी

बुलडाणा (प्रतिनिधी) – शेताच्या सीमेचा वाद विकोपाला गेल्यामुळे दोन कुटुंबामध्ये सशस्त्र मारामारी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत खरात कुटुंबीयाने सोळंके परिवारावर प्राणघातक हल्ला केला आहे. या हल्ल्यात तीन जण गंभीररीत्या जखमी आहेत. ही घटना सिंदखेड राजा तालुक्यातील डावरगाव येथील असून या प्रकरणी सिंदखेड राजा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमींवर सध्या औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार सिंदखेडराजा तालुक्यातील डावरगाव येथील खरात आणि सोळंके परिवाराचे गेल्या १० वर्षांपासून शेतातील रस्त्यासाठी भांडण सुरु आहे. मात्र सोळंके कुटुंबाने हा वाद मिटवण्यासाठी प्रयत्न केला. त्यानंतर भांडण मिटवण्याचा प्रयत्न करताना खरात परिवाराने सोळंके परिवारावर सशस्त्र हल्ला केला आणि मारहाण केली. यामध्ये सोळंके परिवारातील ३ जण जखमी झाले आहेत. हे तिघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहे.

या प्रकरणी खरात परिवारातील एकूण सात जणांविरोधात सिंदखेडराजा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्व आरोपींना अद्याप अटक केलेले नाही. त्यामुळे या हल्ल्यात जखमी झालेले प्रकाश सोळंके यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांना निवेदन दिले आहे. तसेच या घटनेतील आरोपींना तत्काळ अटक करुन कारवाई करावी अशी मागणी केली आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here