अमरावती (क्राइम रिपोर्टर आसिफ कुरैशी) – महाराष्ट्रात अनलॉक केल्यानंतर काही शहरांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा हळूहळू वाढू लागली आहे. याशिवाय कोरोनाच्या डेल्टा प्लस या व्हेरिएंट्सचा धोकादेखील वाढताना दिसत आहे. त्यामुळे प्रशासन आणि सरकार पुन्हा एकदा बॅकफूटवर आलं आहे. त्यामुळे सोमवारपासून (२८ जून) अमरावतीत नवीन निर्बंध लागू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. सोमवारपासून अमरवातीत जीवनावश्यक व बिगर जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांची वेळ आता सकाळी ७ ते दुपारी ४ अशी करण्यात आली आहे. केवळ याच कालावधीत दुकानं सुरु राहणार आहेत.
बिगर जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वीकेंडला बंद ठेवली जातील. तर सर्व प्रकारच्या जिवनावश्यक वस्तू व अत्यावश्यक असलेली किराणा दुकाने, भाजीपाल्याची दुकाने, फळ विक्रेते, डेअरी, बेकरी, मिठाई, खाद्य पेय विक्रेत्यांची दुकाने, पिठाची गिरणी, इत्यादी सर्व प्रकाराची खाद्य पदार्थ विक्रीची दुकाने (कोंबडी, मटण, पोल्ट्री मासे व अंडी यांसह) दुग्ध विक्री केंद्रे, दुग्धालय, डेअरी, दूध संकलन केंद्र, दूध वितरण व्यवस्था सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंत सुरु राहील.
पाळीव प्राण्यांच्या खाद्यपदार्थांची विक्री करणारी दुकानं, कृषी सेवा केंद्रे, कृषी निविष्ठांची दुकाने, कृषी प्रक्रिया उद्योगगृहे, शेती अवजारे आणि शेतातील उत्पादनांशी संबंधित दुकाने, सर्व प्रकारची बिगर जीवनावश्यक सेवाअंतर्गत असलेली दुकाने, प्रतिष्ठाने, कृषी संबंधित सर्व प्रकारची कामे, बांधकामे, सर्व प्रकारची शासकीय रास्त भाव दुकाने सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू राहतील.
दरम्यान, अमरावतीकरांना प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे की, २७ जून रोजी (रविवारी) शहरातील कोव्हिड-१९ लसीकरण बंद राहील. सोमवारपासून (२८ जून) लसीकरण होणार की नाही, झाल्यास ते कोणत्या वेळेत होईल, याबाबतच्या सूचना लवकरच देण्यात येतील असेही सांगण्यात आले आहे.






