रत्नागिरी (प्रतिनिधी) – लोटे एमआयडीसी येथे एक्सल फाटयावर एका बोलेरो पिकअपमध्ये गोवा बनावटीचा विदेशी मद्यसाठा राज्य उत्पादन शुल्क खेड विभागाच्या पथकाने जप्त केला आहे. याबाबत उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी एक्सेल फाटा येथे गोव्याहून पनवेलकडे जाणाऱ्या संशयित वाहनांची दारूबंदी कायद्याअंतर्गत तपासणी करत असताना एका बोलेरो पिकअप टेम्पोला तपासणीसाठी थांबविले.
तपासणीत टेम्पोच्या मागील भागात खाकी रंगाच्या पुठठयांच्या बॉक्समध्ये गोवा बनावटीची ७५० मि.लि.च्या गोल्डन अॅश ब्ल्यु फाईन व्हिस्कि, गोल्ड अॅण्ड ब्लॅक ट्रिपल एक्स रम असे एकुण ९२ बॉक्स एवढा विदेशी मद्यसाठा आढळला. याप्रकरणी टेम्पोचालक पांडुरंग दयानंद कदम (रा.वालोपे बेंडकरवाडी ता.चिपळुण) याला ताब्यात घेत त्याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याकडून विदेशी मद्यसाठा,मोबाईल व बोलेरो पिकअप टेम्पो असा एकूण ११ लाख ६२ हजार एवढया किमतीचा मुद्येमाल जप्त करण्यात आला आहे.
या कारवाईमध्ये राज्य उत्पादन शुल्क खेड विभागाचे प्रभारी निरीक्षक शंकर जाधव, दुय्यम निरीक्षक व्ही.व्ही.सकपाळ, सहायक दुय्यम निरीक्षक आर.बी.भालेकर, जवान ए.के.बर्वे तसेच चिपळुण विभागाचे प्रभारी निरीक्षक एस.एन.पाटील, दुयम निरीक्षक एन.डी. पाटील, वाहन चालक ए.व्ही.वसावे तसेच जवान एस.एन.वड व शेख सहभागी झाले होते. या गुन्ह्याचा पुढील तपास खेडचे प्रभारी निरीक्षक शंकर जाधव करीत आहेत. लॉकडाऊनच्या कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी लोटे येथे अनेकदा गोवा बनावटीचा मद्यसाठा जप्त केला आहे. मात्र अद्यापही या गोव्यातील मद्य आयात करणारा मुख्य सुत्रधार पकडण्यात यश आलेले नाही.






