ओबीसी आरक्षणावरून एकनाथ खडसे यांनी साधला निशाणा
जळगाव (जिल्हा प्रतिनिधी निलेश पाटील) : ‘आपल्या हाती सत्ता दिली तर ओबीसींना ४ महिन्यांत आरक्षण देऊ, अन्यथा राजकारणातून संन्यास घेऊ’, अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या चक्काजाम आंदोलनावेळी केली होती. मात्र, त्यांची वक्तव्य विश्वास ठेवण्यासारखी नाहीत. यापूर्वीही त्यांनी जोपर्यंत वेगळा विदर्भ होत नाही, तोपर्यंत लग्न कराणार नाही अशी प्रतिज्ञा केली. परंतु, ती मोडून त्यांनी लग्न केले, असा चिमटा राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी फडणवीसांना घेतला आहे.
आपल्या हाती सत्ता दिली तर ओबीसींना ४ महिन्यांत आरक्षण देऊ, अन्यथा राजकारणातून संन्यास घेऊ, अशी भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली होती. यावरूनही खडसे यांनी फडणवीसांना चिमटा घेतला. फडणवीस वारंवार अशी वक्तव्ये करतात. ती विश्वास ठेवण्यासारखी नाहीत. फडणवीस यांनी यापूर्वी वेगळ्या विदर्भाच्या आंदोलनावेळीही, वेगळा विदर्भ होत नाही तोपर्यंत आपण लग्न करणार नाहीत, अशी भीष्मप्रतिज्ञा केली होती. पण त्यांनी ही भीष्मप्रतिज्ञा मोडून लग्न केले. फडणवीस यांनी आपण राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती करणार नाही, असेही सांगितले होते. पण पहाटे त्याच राष्ट्रवादी काँग्रेससोबत शपथ घेतल्याची आठवणही खडसे यांनी करुन दिली.
देवेंद्र फडणवीस यांनी राजकारणातून संन्यास घेऊ नये. ते विरोधी पक्षनेते म्हणून उत्तम काम करत आहेत. पाच वर्षे त्यांनी विरोधी पक्षनेते म्हणून काम करत रहावे आणि सरकारला अशाच पद्धतीने सूचना देत रहावे, अशी विनंती आपण फडणवीस यांना करेन, असेही खडसे म्हणाले.






